सामाजिक दायित्व निधीचा वापर; अल्प उत्पन्न गटातील २५ हजार जणांना लस देण्याचे नियोजन

नवी मुंबई : एकीकडे लस खरेदी बारगळली असून दुसरीकडे शासनाकडून आवश्यक तेवढा लस पुरवठा होत नाही. यामुळे शहरात लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. हा पेच सोडविण्यासाठी महापलिका प्रशासनाने आता सामाजिक दायित्व निधीचा पर्याय शोधला आहे. या निधीतून येत्या काळात अल्प उत्पन्न गटातील २५ हजार नागरिकांना मोफत लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणाला गती मिळणार आहे.

नवी मुंबई शहराची लोकसंख्या १५ लाख असून या सर्वाचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेने चोख व्यवस्था उभी केली आहे. १०० हून अधिक लसीकरण केंद्रे तयार केली असून दिवसाला २५ हजार जणांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र शासनाकडून लसच उपलब्ध होत नसल्याने सध्या दिवसाला सरासरी एक हजार जणांनाच पालिका लस देऊ शकत आहे. त्यात अनेक दिवस ही केंद्रे बंद ठेवावी लागत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने लस खरेदीचीही तयारी केली होती. यासाठी जागतिक निविदाही काढल्या होत्या. मात्र तांत्रिक कारणास्तव हे खरेदीही बारगळली आहे. त्यामुळे शहरात लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. यामुळे सशुल्क लसीकरणाकडे नागरिक वळत आहेत. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थती नाही त्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

हा पेच सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता सामाजिक दायित्व निधीचा वापर करण्याचे ठरविले आहे. यात पहिल्या टप्प्यात सिटी बँक यांच्या सामाजिक दायित्व निधीतून व मुंबईतील जसलोक रुग्णालयाच्या सहकार्याने हे लसीकरण होणार असून त्यांना चाईल्ड फंड ऑर्गनायजेशन या संस्थेची मदतही मिळाली आहे. शुक्रवारपासून हे लसीकरण सुरू होणार असून शहरातील २५ हजार झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

यासाठी तुर्भे, इंदिरानगर तसेच कोपरखैरणे या विभागातील नागरिकांचे सर्वेक्षण चाईल्ड फंड या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. यात या लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना कार्ड दिले जात आहे. त्या कार्डवर त्या नागरिकांना त्याच विभागात ठरवून दिलेल्या केंद्रावर येण्याची वेळ दिली जाणार असून त्याप्रमाणे ठरावीक वेळेत त्यांना लस घेता येणार आहे.

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या मोफत लसीकरणासाठी तुर्भे येथील शाळा क्रमांक २२, २५ तसेच कोपरखैरणे गावाशेजारील शाळा क्रमांक ३६ येथे लसीकरण केंद्रे असणार असल्याची माहिती महापालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली. करोनाकाळात महापालिकेला सामाजिक दायित्व निधीतून मोठय़ा प्रमाणात मदत झाली असून त्यातून हे संकट दूर करण्यासाठी मदत होत असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सांगितले.

नवी मुंबई पालिकाक्षेत्रातील झोपडपट्टी विभागातील २५ हजार नागरिकांचे मोफत लसीकरण होणार आहे. एकीकडे शहरात सातत्याने लस तुटवडा जाणवत असताना या संस्थांच्या मदतीने मोफत लसीकरण होणार ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे पालिकेला लसीकरणात मोठी मदत होणार असून लसीकरणाची गतीही वाढणार आहे.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका