नवी मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नवी मुंबईत शिथिल करण्यात आलेले निर्बंध आणि नागरिकांची बेफिकिरी यांमुळे करोनाबाधितांचा आलेख पुन्हा चढणीला लागला आहे. फेब्रुवारी ते मे या तीन महिन्यांत उच्चांकी पातळीवर गेलेला रुग्णवाढीचा आलेख जूनच्या पहिल्या आठवडय़ात खाली आल्यानंतर नंतरच्या तीन आठवडय़ांत तो वाढत आहे. जूनच्या शेवटच्या आठवडय़ात तर दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या वर गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.

पंधरा लाखांची लोकसंख्या असलेल्या नवी मुंबई शहरात करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ११,८४,०९३ नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून १,००७३४ जण करोनाबाधित आढळले आहेत. त्यानुसार १ जुलै रोजी शहराचा एकूण लागणदर ८.३५ टक्के इतका असून १ जूनच्या तुलनेत त्यात एक टक्क्याची घसरण दिसून येते. असे असले तरी, जून महिन्यातील साप्ताहीक रुग्णसरासरीचा अंदाज घेतल्यास रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याचे स्पष्ट होते. जूनच्या पहिल्या आठवडय़ात सरासरी रुग्णसंख्या ९८ इतकी होती. ती दहा जून रोजी ७३ इतकी नोंदवली गेली. त्यानंतरच्या आठवडय़ातही रुग्णसरासरी ७६ इतकी कायम राहिली. मात्र, २४ जून रोजीच्या आकडेवारीनुसार ही संख्या ९१पर्यंत वाढली. एक जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार साप्ताहीक रुग्णसरासरी १२८वर पोहोचली असून गेल्या दोन आठवडय़ांपासून वाढू लागलेल्या रुग्णसंख्येमुळे ही वाढ दिसून येत आहे.

दैनंदिन करोना रुग्णसंख्या आता दीडशेपर्यंत गेली आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ापासून नवी मुंबईत तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू करण्यात आले.  रुग्णवाढ होत असल्याने दैनंदिन करोना चाचण्यांतही वाढ करण्यात आली होती. सरासरी दहा हजार चाचण्या करण्यात येत होत्या. मात्र मॉल बंद करण्यात आल्याने हे प्रमाण दिवसाला सहा ते सात हजारांपर्यंत चाचण्या करण्यात येत आहेत.

सोमवारी २८ जूनपासून शहरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात मॉल, चित्रपट व नाटय़गृह बंद करण्यात आली असून दुकानांच्या वेळांतही बदल करण्यात आले आहेत. सोमवारी शहरात १२,१६४ करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात १६० रुग्ण सापडले होते. त्यानंतर २९ जून रोजी रुग्ण कमी होत ९२ पर्यंत खाली आले होते. गेली दोन दिवस सरासरी सात हजार करोना चाचण्या करण्यात येत असून १४५ व १४६ करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सोमवारपासून गेल्या पाच दिवसांत शहरांतील रुग्णवाढ स्थिर असल्याचे दिसत आहे.

करोना दैनंदिन परिस्थिती

दिनांक         नवे रुग्ण       चाचण्या

२६ जून         १३४             ५२०१

२७ जून        १२५              ९७०४

२८ जून        १६०             १२१६४

२९ जून        ९२               १०२३७

३० जून        १०२             ५८४०

१ जुलै          १४६             ६७०८

२ जुलै           १४४            ६९८५

आठवडय़ातील दैनंदिन रुग्ण सरासरी

३  जून :      ८९

१० जून :      ७३

१७ जून :      ७६

२४ जून :      ९१

१  जुलै  :     १२८

८.३५ : २ जुलैचा एकूण लागण दर