मुंढे यांनी कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांना परतीचे वेध
कामातील अनियमितता, भ्रष्टाचार, बेशिस्त वर्तन असा ठपका ठेवत माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरचा रस्ता दाखविलेल्या महापालिकेतील काही वादग्रस्त अधिकाऱ्यांसाठी पुन्हा एकदा लाल गालिचा अंथरण्याच्या जोरदार हालचाली राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा धसका घेऊन स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेले काही वरिष्ठ अधिकारीही महापालिकेच्या सेवेत पुन्हा रुजू होता यावे, यासाठी मोर्चेबांधणी करत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
मुंढे यांच्या काळात दुकानदारी बंद झाल्याने अस्वस्थ झालेल्या नगरसेवकांची टोळी या अधिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी व्यूहरचना करत असून काही अर्थपूर्ण तडजोडींनाही ऊत आल्याची चर्चा आहे.
तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारभार करत नवी मुंबई महापालिकेतील भ्रष्ट राजकीय तसेच प्रशासकीय व्यवस्थेला गेले १० महिने सळो की पळो करून सोडले होते. अवाच्या सवा दराने निविदा काढणे, चढय़ा दराने त्या ठेकेदारांना बहाल करणे आणि टक्केवारीचे गणित मांडणे यात महापालिकेतील काही ठरावीक अधिकारी भलतेच माहीर असल्याचे बोलले जाते.
तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या काळात यापैकी अनेकांची पाचावर धारण बसली. वाशी सेक्टर १० येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयातील तीन मजले फोर्टीज समूहास रुग्णालयासाठी बहाल करताना महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या वादग्रस्त व्यवहारांची मुंढे यांनी चौकशी सुरू केली होती. या चौकशीचा धसका घेत या वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंढे यांच्या काळातच स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मालमत्ता कर वसुली विभागात शेकडो कोटी रुपयांचा कर बुडविणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करत मुंढे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीचा फेरा सुरू केला होता.
शहरातील काही बडय़ा बिल्डरांना नियम वाकवून बांधकाम परवानग्या देणारा अभियंता, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राचे प्रकल्प अवाच्या सवा दराने कंत्राटदारांना बहाल करणारा वरिष्ठ अधिकारी तसेच विद्युत कामांमध्ये सावळागोंधळ करत ठरावीक ठेकेदारांचे उखळ पांढरे करणाऱ्या अभियंत्यांविरोधात मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. याशिवाय काही प्रभाग अधिकारी, साहाय्यक आयुक्त यांनाही कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत मुंढे यांनी घरी बसविले होते. या सर्वाना आता परतीची आस लागली आहे.
पुनर्वसनाच्या हालचाली
’ तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावरून बदली होताच या वादग्रस्त मंडळींच्या पुनर्वसनाच्या जोरदार हालचाली महापालिका वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मुंढे यांच्या काळात सुरू झालेली काही चौकशी प्रकरणे बंद व्हावीत यासाठी महापालिकेतील नगरसेवकांची एक टोळी भलतीच सक्रिय आहे.
’ फोर्टीज रुग्णालय प्रकरणात वादग्रस्त करार करणारा एक अधिकारी पुन्हा महापालिका सेवेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंढे यांनी जबरदस्तीने स्वेच्छानिवृत्तीस भाग पाडले, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्यासाठी शहरातील बडे राजकीय नेते तसेच महापालिकेत ‘वजन’ असलेल्या ठरावीक पदाधिकाऱ्यांकडे हा अधिकारी खेटे घालत असल्याची चर्चा आहे.
’ विद्युत विभागातील वादग्रस्त प्रकरणांची सविस्तर माहिती मुंढे यांनी नगरविकास विभागाला कळवली असली तरी या विभागातील वादग्रस्त अधिकारी अभय मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत.
’ मुंढे यांच्याशी जवळीक साधून असलेल्या तसेच प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांनाही ठरावीक नगरसेवकांकडून धमकाविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आम्हाला सहकार्य करा अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे इशारे दिले जात असल्याचे बोलले जाते.
’ मुंढे यांच्या जागी आयुक्तपदी विराजमान झालेले एन. रामास्वामी पदभार स्वीकारताच रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत या घडामोडींना भलताच वेग आला आहे. याप्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.
