नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील नेरुळच्या प्रभाग क्रमांक २३ बमधून निवडून आलेल्या नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या नगरसेवक पदावर न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यांच्या पतीच्या कथित अनधिकृत बांधकामासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिला असून, पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.
या प्रकरणात नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवलेल्या उमेदवार अश्विनी माने यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत नगरसेविका रुपाली भगत यांच्या पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी करताना बेलापूर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश के.एन. फटांगरे यांनी, अंतिम निर्णय होईपर्यंत आणि संबंधित प्रतिवादीने आपले स्पष्टीकरण सादर करेपर्यंत, रुपाली भगत यांना स्वतःला नगरसेविका म्हणून सादर करता येणार नाही तसेच नगरसेवक पदाशी संबंधित कोणतेही अधिकृत कामकाज करता येणार नाही, असा स्पष्ट आदेश दिला आहे. विशेष म्हणजे या आदेशामुळे गुरुवारी होणाऱ्या महासभेला भगत यांना उपस्थित राहता येणार नाही.
प्रतिवादींना कारणेदाखवा नोटीस
न्यायालयाने या प्रकरणातील सर्व प्रतिवादींना कारणेदाखवा नोटीस बजावली असून, सदर स्थगिती कायमस्वरूपी का लागू करू नये, याबाबत त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या नोटिसीवरील पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. तोपर्यंत नगरसेवक पदावर असलेली ही तात्पुरती स्थगिती कायम राहणार आहे. दरम्यान, याचिकाकर्त्या अश्विनी माने यांना न्यायालयाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचा पुरावा न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील सुनावणीत या प्रकरणाची दिशा अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पदाच्या अधिकारांबाबत अनिश्चितता
न्यायालयाच्या या आदेशामुळे नेरुळच्या प्रभाग क्रमांक २३ ब मधील नगरसेवक पदाच्या अधिकारांबाबत सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर विकासकामे, नागरिकांचे प्रश्न तसेच महापालिकेतील कामकाजावर या आदेशाचा काय परिणाम होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसेच, या प्रकरणाकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले असून, १२ फेब्रुवारीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

