बनावट करोना अहवाल महागात ; न्यायालयाच्या आदेशानंतर सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल

जिल्ह्याची शल्यचिकित्सकांची एक अभ्यास समिती याबद्दल चौकशी अहवाल लवकरच पोलिसांना देणार आहे.

doctor

पनवेल : गेल्या वर्षी उपचारादरम्यान येथील एका वकील महिलेचा मृत्यू झाला होता. या वेळी डॉक्टरांनी तिला करोना झाल्याचा अहवाल दिल्याने मृतदेहाचे शवविच्छदेन करण्यात आले नव्हते. मात्र नातेवाईकांना उपचारात हलगर्जी झाल्याचा संशय होता. त्यामुळे ते न्यायालयात गेले होते. वर्षभर यावर न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर न्यायालयाने संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गर्भपिशवी स्वच्छ करण्यासाठी गेल्या वर्षी वकील अश्विनी थवई या पनवेलमधील पटेल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. १ मे रोजी उपचारादरम्यान थवई यांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर रुग्णालयाच्या डॉ. कृतिका पटेल यांनी त्यांना तातडीने कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज असल्याने येथील गांधी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे २४ तासांनंतर अश्विनी यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन टाळण्यासाठी मृत अश्विनी या करोनाबाधित असल्याचा अहवाल वाशी येथील एका प्रयोगशाळेने दिला. त्यानंतर याच प्रयोगशाळेसह इतर तीन प्रयोगशाळांनी मृत अश्विनी यांना करोना झाला नसल्याचा अहवाल दिल्यामुळे पनवेल वकील संघटना आणि थवई कुटुंबीयांनी याबाबत पनवेलच्या न्यायालयात दाद मागितली होती. अखेर गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या न्यायालयीन लढय़ाचा निकाल गेल्या आठवडय़ात लागला आहे.

यात पनवेलच्या न्यायालयाने संबंधित प्रयोगशाळेचे मालक, पटेल व गांधी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर मृत्यूस कारणीभूत ठरणे, फसवणूक करणे, कट रचणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत डॉक्टर रमेश पटेल, कृतिका रमेश पटेल, डॉ. धर्मेश मेहता (भूलतज्ज्ञ), डॉ. प्रमोद गांधी, डॉ. मानसी ठाकूर (वाशी येथील यूडीसी सॅटेलाइट लॅबोरेटरी), डॉ. जयंत सरगर (यूडीसी सॅटेलाइट लॅबोरेटरी) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्याची शल्यचिकित्सकांची एक अभ्यास समिती याबद्दल चौकशी अहवाल लवकरच पोलिसांना देणार आहे.

ही लढाई नुकसानभरपाई मिळावी म्हणून नव्हती. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितले होते. मात्र आम्हाला शेवटपर्यंत अंधारात ठेवण्यात आले. असाच प्रकार गांधी रुग्णालयातही घडला. मृत्यूचे नेमके कारण समजू नये म्हणून अश्विनी या करोनाबाधित असल्याचा खोटा अहवाल देण्यात आला. डॉक्टर हीसुद्धा माणसेच असतात, मात्र स्वत:ची चूक लपविण्यासाठी इतरांना दोषी ठरविण्याच्या वृत्ती घातक असल्याने न्यायालयात धाव घेतली होती, असे  याचिकाकर्ते  निशांत थवई यांनी सांगितले.

पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायालयात दाद

अश्विनी यांना जास्त प्रमाणात भूल दिल्यामुळे तसेच शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे अश्विनीचा मृत्यू पटेल रुग्णालयामध्ये झाल्याचा मृताच्या कुटुंबीयांचा आरोप होता. तसेच मृत अश्विनी यांना गांधी रुग्णालयानेही एक दिवस जीवरक्षक प्रणालीवर ठेवल्याचा आरोप होता. याबाबत मृत अश्विनीचे पती निशांत थवई यांनी पवनेल शहर पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणात काहीच कारवाई न केल्याने  निशांत थवई यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Court order to register case against six doctors for fake covid report zws

Next Story
उरणमध्ये कामगारांचा मोर्चा
ताज्या बातम्या