दिवसभरात ३८,०८६ जणांना लसमात्रा

नवी मुंबई : जानेवारीपासून शहरात करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक लसीकरण बुधवारी करण्यात आले. दिवसभरात ३८,०८६ जणांना लस देण्यात आली असून यात पालिकेच्या केंद्रांवर ३४,११२ तर खासगी रुग्णालयात ३९७४ जणांना लस देण्यात आली. यापूर्वी  एका दिवसात सर्वाधिक २४,८०० जणांना लस देण्यात आली होती.

मंगळवारी नवी मुंबई महापालिकेला कोव्हिशिल्डच्या ४५,६०० लसमात्रा मिळाल्या होत्या. त्यामुळे बुधवारी १८ ते ४४ वयोगटासाठी पहिल्या मात्रेचे शंभर केंद्रांवर मेगा लसीकरण आयोजित केले होते. यात ४१ हजार जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते.

एकीकडे पाऊस तर दुसरीकडे दोन दिवसावर आलेला गणेशोत्सव यामुळे लस घेतल्यानंतर ताप येईल, यामुळे काही जणांनी लस घेतली नाही. तरीदेखील बुधवारी झालेले लसीकरण सर्वाधिक झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. पालिकेने शहरात १०० केंद्रावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी काळात मोठय़ा प्रमाणात लस प्राप्त करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून जास्तीत जास्त मेगा लसीकरण करण्यासाठी पालिका लसउपलब्धतेनुसार तयार असल्याची माहिती पालिका आयुक्त बांगर यांनी दिली. शहराच्या १५ लाख लोकसंख्येपैकी १० लाख ८० हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. आजच्या लसीकरणामुळे  ९ लाखांहून अधिक नागरिकांना पहिल्या लसमात्रेचे सुरक्षाकवच मिळाले आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी लसपात्र असलेल्या १०० टक्के नागरिकांना किमान एक मात्रा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.