कळंबालीत खाडीपात्र ‘लाल’

कळंबोली, तळोजा व खारघर येथे जल आणि वायू प्रदूषणाच्या अनेक तक्रारी दिवसाआड केल्या जात आहेत

पनवेल : कळंबोली लोखंड-पोलाद बाजारातून कळंबोली वसाहत व त्यानंतर थेट खाडीपात्रात जाणाऱ्या पाटाचे पाणी गुरुवारी सायंकाळी अचानक लाल रंगाचे दिसू लागले. या पाण्यातून उग्र दर्प येऊ  लागल्याने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रदूषित पाणी खाडीपात्रात सोडणाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

कळंबोली, तळोजा व खारघर येथे जल आणि वायू प्रदूषणाच्या अनेक तक्रारी दिवसाआड केल्या जात आहेत. पहाटे गुदमरणारा वायू हवेतून घराघरापर्यंत पोहोचतो. त्याचप्रमाणे कासाडी नदीचे पात्र दूषित करणाऱ्यांनाही अनेकदा रंगेहाथ नागरिक, पोलिसांनी पकडले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी वेळोवेळी होते. मात्र कायद्यात कठोर कारवाईचा पर्याय नसल्याने महाड, भिवंडी व इतर औद्योगिक क्षेत्रातील घातक रसायने रोडपाली, खिडुकपाडा येथील नाल्यांमध्ये सोडले जात असल्याचे बोलले जाते. आतापर्यंत अनेकांना या प्रकरणी अटकही झाली आहे. मात्र त्यानंतरही गुरुवार दुपार ते सायंकाळपर्यंत लाल भडक पाण्याचे पाट कळंबोली खाडीपात्रात नागरिकांना पाहायला मिळाले. औद्योगिक वसाहतीमध्ये मंदीचे वातावरण असल्याने कोणत्या रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांनी ही रसायने खाडीपात्रात सोडली असावीत, असा संशय अनेकांनी व्यक्त केला. तर यामागे काही लोक असल्याची शक्यता पनवेल शहराचे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुदाम पाटील यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे कासाडी नदीपात्र, औद्योगिक वसाहत आणि प्रदूषणाच्या समस्येवर राष्ट्रीय हरित लवाद, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सर्वोच्च न्यायालयापर्यंत नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी लढा दिल्यानंतरही ही समस्या कायम आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Creek basin water suddenly turns red in kalambali zws

ताज्या बातम्या