नेरुळ अतिक्रमण कारवाईदरम्यान मृत्यू प्रकरण

नवी मुंबई : नेरुळ येथे बेकायदा झोपडपट्टीवर अतिक्रमण कारवाईदरम्यान सोमवारी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या नेरुळ अतिक्रमण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यासह जेसीबी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. 

नेरुळ गावदेवी मैदान परिसरात बेकायदा झोपडपट्टी वाढल्याने महापालिकेच्या नेरुळ विभागचे अतिक्रमण पथक पोलीस बंदोबस्तात सोमवारी या ठिकाणी कारवाईसाठी गेले होते. या पथकाला कारवाई करण्यास तेथील झोपडपट्टीधारकांनी विरोध केला. मात्र पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण पथकाने कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू असताना एका पाडलेल्या झोपडीखाली एक व्यक्ती आढळून आली. कोणतीही हालचाल करीत नसल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या मयत व्यक्तीचे नाव भीमराव गजभर होते. यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. झोपडपट्टीधारक आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी या कारवाईतच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करीत कारवाईपूर्वी झोपडीत कोणी नसल्याची खात्री का केली नाही? असा आरोप पालिका प्रशासनावर केला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी याप्रकरणी निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या नेरुळ अतिक्रमण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यासह जेसीबी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यचे कारण पुढे येणार आहे.

कारवाईपूर्वी झोपडीतील सामान काढण्यास सांगण्यात आले होते तसेच प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यापूर्वी झोपडीत कोणी आहे का याचीही खात्री करून कारवाई केली होती. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. -अमरीश पटनीगिरे, उपायुक्त,  अतिक्रमण विभाग, महापालिका

निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यू नक्की कशाने झाला हे पुढे येईल व त्यानुसार कारवाईची दिशा ठरेल. -गजानन राठोड,  साहाय्यक पोलीस आयुक्त