scorecardresearch

पाणी देयकांची ३२ कोटींची थकबाकी; उरण तालुक्यातील ग्रामपंचयतींचे दुर्लक्ष

तालुक्यातील ग्रामपंचायतीना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे.

उरण : तालुक्यातील ग्रामपंचायतीना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. यापोटी १९ ग्रामपंचायतीकडे मार्च २०२२ अखेर २६ कोटी ३४ लाख ५९ हजार ७१३ रुपये इतकी थकबाकी आहे. यामध्ये ज्या ग्रामपंचयातीचे पाणी सध्या बंद असले तरी त्यांच्या थकबाकी धरल्यास ही थकबाकी ३२ कोटींच्या घरात आहे.
या वाढत्या थकबाकीमुळे एमआयडीसीच्या उरण मधील विकास कामानाही खीळ बसली असून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये आर्थिकदृष्टय़ा सधन समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींचा ही समावेश आहे. तसेच नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करूनही ती भरली जात नाही.
उरण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि २६ ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणीपुरवठय़ाची देयके भरण्याची तत्परता मोजक्या काही ग्रामपंचायतीवगळता ग्रामपंचायतीकडून दाखवली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींकडील पाणी देयकांची थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्याकाठी आणि दरवर्षी वाढतच चालला आहे.
२०१९ मध्ये तालुक्यातील या ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची २७ कोटी ११ लाख १६ हजार ०६७ थकबाकी होती. या थकबाकीदारांमध्ये नवीन शेवा १ कोटी ०९ लाख १७ हजार ५९२, हनुमान कोळीवाडा ३६ लाख ५५ हजार ४९०, करळ ८१ लाख ४९ हजार ५५१, धुतुम १ कोटी १७ लाख ८१ हजार ९४२, जसखार १ कोटी ७२ लाख ७६ हजार ३९७, बोकडवीरा २ कोटी ४९ हजार ७१३, फुंडे २ कोटी ८७ लाख ६९ हजार २७७, सावरखार ४८ लाख ७४ हजार २३२, डोंगरी ५५ लाख ९ हजार २११, सोनारी १ कोटी ३४ लाख ६६ हजार ८९६, नागाव १ कोटी २९ लाख १७ हजार ७३५, चाणजे ७ कोटी ६९ लाख २५ हजार ३६, पाणजे २ लाख ९९ हजार ५८१, चिर्ले २ कोटी १० लाख ८० हजार १२१, केगाव १ कोटी ९२ लाख ५९ हजार ७६८, म्हातवली ८३ लाख ४६ हजार ९२, तेलीपाडा ०१ लाख ६५ हजार २२० आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या थकबाकीदारांमध्ये जेएनपीटी हद्दीतील नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, डोंगरी, जसखार, सोनारी, करळ, सावरखार,बोकडवीरा या नऊ तर ओएनजीसी हद्दीतील नागाव, म्हातवली, चाणजे या तीन अशा एकूण आर्थिकदृष्टय़ा सधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
पचिरनेर कनेक्शन, खोपटा कनेक्शन, दिघोडे, दादरपाडा, वेश्वी, रांजणपाडा, नवघर, पागोटे आदी विभागांकडेही सुमारे साडेपाच कोटी रूपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जमेस धरल्यास एमआयडीसीची पाणी बिलाची थकबाकी ३२ कोटींच्या जवळपास आहे. या आठ ग्रामपंचायतींना मागील ३ ते ४ वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींना सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.
ग्रामपंचायतींकडून टाळाटाळ
वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटिसाही बजावण्यात येत आहेत. मात्र त्यानंतरही थकबाकीदार ग्रामपंचायतींकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यात टाळाटाळ केली जात आहे. ग्राममपंचायतींकडे असलेल्या कोटय़वधींची असलेल्या थकबाकीमुळे मात्र एमआयडीसीच्या विकासकामांना खीळ बसली असल्याची माहिती उरण उपअभियंता रवींद्र चौधरी यांनी दिली.
चार गावांचा आदर्श
उरण तालुक्यातील जासई, भेंडखळ, बालई व तेलिपाडा यांची देयके नियमित भरली जात असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crore arrears water bills neglect gram panchayats uran taluka midc amy

ताज्या बातम्या