‘एनएमएमटी’त प्रवाशांची तुडुंब गर्दी

नवी मुंबई : तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता शहरात पुन्हा करोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत, मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाहता शहरात करोना आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. रिक्षांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी भरले जात असून ‘एनएमएमटी’ बसमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नसते इतकी गर्दी होत आहे.

नवी मुंबईत दोन अंकी असलेली करोना रुग्णसंख्या आता तीन अंकांवर पोहचली आहे. तसेच उपचाराधीन रुग्णही दीड हजारांच्या घरात आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दुसरी लाट ज्या वेगाने पसरेल ती परिस्थती सध्या नाही. शहरात शंभर ते दीडशेच्या घरात रुग्णसंख्या स्थिर आहे.

मात्र रस्त्यावर वाहनांची व बाजारांत नागरिकांची मोठी वर्दळ दिसत आहे. त्यात सध्या लोकल प्रवास बंद आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रवासी वाहतुकीचा ताण आलेला आहे. बहुतांश आस्थापना सुरू असल्याने रिक्षा व बस वाहतुकीत मोठी गर्दी दिसत आहे. शहरात एनएमएमटी बस सेवा सुरू आहे, मात्र सध्या कमी फेऱ्या होत आहेत. त्यामुळे प्रवासी जास्त व फेऱ्या कमी असल्याने प्रत्येक बस खचाखच भरलेली दिसत आहे. नेहमीपेक्षा किमान ५० ते ६० बस कमी सोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांवर पडत असून खचाखच गर्दी होत आहे. सकाळी साडेनऊ  ते ११ व सायंकाळी ७ ते ९ या दरम्यान प्रचंड गर्दी होत आहे. बसमध्ये आसन क्षमतेएवढे प्रवासी व उभे पाच प्रवासी अशी परवानगी आहे, मात्र प्रत्यक्षात किमान २० ते २५ प्रवासी उभे राहून प्रवास करीत आहेत.