scorecardresearch

‘सीआरझेड’मुळे द्रोणागिरीतील ९४ बांधकाम प्रकल्प रखडले

सागरी नियमन क्षेत्र (सीआरझेड) नियमांमुळे उरणच्या द्रोणागिरी पट्टय़ातील ९४ बांधकाम प्रकल्प रखडले असून त्यात घरे खरेदी केलेल्या ४ हजार ५०० सदनिकाधारकांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेली नाही.

उरण : सागरी नियमन क्षेत्र (सीआरझेड) नियमांमुळे उरणच्या द्रोणागिरी पट्टय़ातील ९४ बांधकाम प्रकल्प रखडले असून त्यात घरे खरेदी केलेल्या ४ हजार ५०० सदनिकाधारकांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेली नाही. त्यामुळे खरेदीदारांना याचा फटका बसला आहे. अनेकांचा कष्टाने गुंतवलेला पैसा यात अडकून पडला आहे.
द्रोणागिरी नोड विकास आराखडय़ाला (डीपी) सीआरझेडची मंजुरीच मिळालेली नाही, असे पर्यावरणस्नेही संस्था नॅट कनेक्ट फाऊंडेशनचे म्हणणे आहे. महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) कडून माहितीच्या अधिकारात त्यांनी ही माहिती मिळविली आहे.
सिडकोने या प्रकल्पांच्या बांधकाम व्यावसायिकांना बांधणी परवानगी किंवा प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी) दिले, मात्र पर्यावरण मंजुरी नसल्याने त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नाही. यासह सीआरझेड प्रतिबंधापायी दोनशेहून अधिक घरांना प्रारंभ प्रमाणपत्रही मिळालेले नाही. या प्रकल्पासंबंधी कायदेशीर वाद सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असूनही सिडकोने बांधकामास परवानगी दिली, हे दुर्दैवी असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
द्रोणागिरी क्षेत्रात सिडको, जेएनपीटी आणि डी-नोटीफाय नवी मुंबई सेझने मोठय़ा प्रमाणावर भराव टाकून कांदळवने आणि पाणथळींचा विनाश केला आहे. आम्ही त्याबद्दल पर्यावरण विभागासह अनेक प्राधिकरणांकडे पाठपुरावा करत आहोत. अनेक मुख्य प्रकल्पांना सीआरझेड मंजुरी मिळाली नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले, अशी माहिती नॅट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी दिली.
नेरुळमधील सेक्टर ६० परिसरात सीआरझेड दोन भागांत उभ्या राहणाऱ्या बडय़ा निवासी प्रकल्पांत खरेदी करू पाहणाऱ्या प्रस्तावित गृह खरेदीदारांकरिता हा मोठा धडा असल्याचे सेव्ह नवी मुंबई एनव्हायरमेंट ग्रुपचे पर्यावरणप्रेमी सुनील अग्रवाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crz halts construction projects dronagiri regulation area project amy

ताज्या बातम्या