नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने करोडो रुपये खर्च करुन शहरातील माता बाल रुग्णालयांची सार्वजनिक रुग्णालये केली. वर्षानुवर्ष रुग्णालयाच्या टोलेजंग इमारती फक्त शोभेच्या वस्तू ठरल्या होत्या.परंतू करोनाच्या काळात याच इमारतींच्या सुविधा वाढवून आता खाजगी रुग्णालयासारख्या चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत.एकीकडे पालिकेचा आरोग्य विभाग चांगल्या सुविधा देत असताना पालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिकेच्या रुग्णालयात पालिकेने स्वतः सिटीस्कॅन सुविधा सुरु केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाशी सार्वजनिक रुग्णालयाच्या वर्धापनदिनाच्या दिवशीच १ मे २०२२ या दिवसापासून सुविधेचा प्रारंभ झाला असून गेल्या ६ महिन्यातच जवळजवळ ३ हजारापेक्षा अधिक रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ मे २०२२ पूर्वी रुबी नावाच्या एका खाजगी संस्थेच्या मदतीने पालिका ही सुविधा देत होती.परंतू करोनाच्या काळात सामाजिक दायित्व फंडातून मिळालेली सिटीस्कॅन सुविधा मागील ६ महिन्यापासून वाशी पालिका रुग्णालयात सुरु करण्यात आली आहे.आतापर्यंत पालिका आरोग्यसेवेचा संपूर्ण ताण वाशी रुग्णालयावरच होता. करोनाच्या आधी नेरुळ व ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांचा कारभार म्हणजे मिळाले तर उपचार नाहीतर रुग्णालयाच्या टोलेजंग इमारती नुसत्या शोभेच्या वास्तू असा प्रकार पालिकेच्या विविध हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळत होता.वाशी येथील रुग्णालयात रुबी हेल्थ केअरच्या माध्यमातून सिटीस्कॅनची सुविधा चालवली जात होती. परंतू आता पालिकेला करोनाकाळात सामाजिक दायित्व फंडातून मिळालेल्या १.९० कोटी फंडातून सिटीस्कॅन सुविधाच प्राप्त झाली आहे.

हेही वाचा : कास महोत्सवाचे शासनाकडूनच आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे स्पष्टीकरण

करोनाकाळात संपूर्ण शहराचे व पालिकेचे करोना काळातील मध्यवर्ती करोना उपचार केंद्र असेल्या वाशी सिडको प्रदर्शनी केंद्र येथे ही सुविधा सुरु होती. करोनाकाळात सुरवातीला एचआरसिटी करण्यासाठी करोना रुग्णांना वाशी येथील पालिका रुग्णालयातच आणले जात होते. नवी मुंबई महापालिकेत वाशी येथे ३०० खाटांचे प्रथम संदर्भ रुग्णालय आहे.पालिकेची स्थापन झाल्यापासून या रुग्णालयावर पालिकेच्या आरोगयसेवेची मोठी जबाबदारी असून रुग्णालयांत रुग्णांची सतत गर्दी पाहायला मिळते.तर दुसरीकडे महापालिकेने करोडो खर्चाच्या माताबाल रुग्णालयांच्या पालिकेच्या वाशी रुग्णालयात प्रथमच स्वतःच्या सिटी स्कॅन सेवेला सुरवात झाल्याने सामान्य व गरीब कुटुंबातील रुग्णांना याचा चांगला फायदा होत असल्याची माहिती वाशी रुग्णालयाचे प्रमुख डॉ.प्रशांत जवादे यांनी दिली.तसेच सिटीस्कॅनसाठी लागणारे फिल्म पेपरही उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी लोकसत्ताला दिली.

हेही वाचा : सांगलीत भाजपला दिलासा; खासदार आणि आमदारातील दुरावा दूर

पालिकेने शासकीय परवानगीसह संपूर्ण अद्ययावत प्रय़ोगशाळा फक्त ११ दिवसात पूर्ण करुन ४ ऑगस्ट २०२० पासून नेरुळ येथील मिनाताई ठाकरे रुग्णालयात पालिकेची व एमएमआर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची सर्वाधिक अद्ययावत व मोठ्या क्षमतेची प्रयोगशाळा महापालिकेने सुरु केली.पालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या प्रयोगशाळेमुळे मोठी सुविधा प्राप्त झाली होती. दुसरीकडे वाशी प्रदर्शनी केंद्र येथे पालिकेला सामाजिक दायित्व निधीमधून जवळजवळ १.९० कोटी रुपयांची मिळालेली सिटीस्कॅन मशीन वाशी रुग्णालयात सुरु असून हजारो नागरीकांना मदत होत आहे.करोनाच्या आजारामध्ये शरीरातील फुफ्फुसावर मोठा परीणाम होत असल्याने अनेक रुग्ण दगावले जात होते.त्यामुळे फुफ्फुसामध्ये झालेला संसर्ग तपासण्यासाठी सिटीस्कॅन करुन घेणे गरजेचे होते.पालिकेला सिटीस्कॅन मशीन तत्कालिन पालिका आयुक्त अभिजीत बांगर तसेच अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे यांच्या पुढाकारातून सामाजिक दायित्व फंडातून या सुविधेसाठी १ कोटी ९० लाखांची मदत झाली आहे.जर्मनीवरुन ही मशीन आणली गेली होती.पालिकेच्या वाशी रुग्णालयात पालिकेची स्वतःची सिटीस्कॅन सुविधा सुरु झाल्याने हजारो सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होत आहे.१ मे २०२२ पासून पालिका रुग्णालयात आतापर्यंत ३ हजारापेक्षा अधिक नागरीकांनी सिटीस्कॅन केले आहे.

यांना मिळणार मोफत सुविधा…..

शहरातील ज्येष्ठ नागरीक,बीपीएल नागरीक, दिव्यांग, तसेच ३ लाखाच्या आतील उत्पन्न असेल्यांना५० टक्के सूट मिळत असून आतापर्यंत जवळजवळ ३ हजारपेक्षा अधिक नागरीकांना या सुविधेचा फायदा झाला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ct scan facility help for patients vashi navi hopsital mumbai muncipal carporation tmb 01
First published on: 07-10-2022 at 09:33 IST