नवी मुंबई : शहरात शुक्रवारी दैनंदिन करोना रुग्णांची संख्या एक हजारापर्यंत पोहचली असून ही करोना साखळी तोडण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील जास्तीत जास्त जणांचा शोध व प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजना यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने रुग्णसंख्येनुसार प्रतिबंधित क्षेत्रांचे तीन प्रवर्ग केले असून यात ४१२ प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश आहे. दहापेक्षा जास्त करोना रुग्णसंख्या असलेले एकच प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे प्रशासनाने सांगितले.

नवी मुंबई दैनंदिन करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णवाढीचा दर हा २० टक्केपर्यंत पोहचला आहे. हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक असल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे. करोना चाचण्यांची संख्याही दुपटीने वाढवत सहा हजारापर्यंत करण्यात आली आहे. यात सर्वाधिक बाधित हे कोणतीच लक्षणे नसलेली असल्याने संसर्गाची साखळी तोडणे कठीण होणार आहे. यासाटी महापालिका प्रशासनाने बाधिताच्या संपर्कातील कमीत कमी ३२ जणांचा शोध घेत त्यांच्या चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिबंधीत क्षेत्र तयार करीत उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. यासाठी विभागनुसार सहाय्यक आयुक्तांची नियुक्त केली आहे.

पालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राचे तीन प्रवर्ग केले आहेत. प्रवर्ग एक मध्ये गृहसंकुले, सोसायटी, प्रवर्ग दोन मध्ये वैयक्तीक घरे, बंगलो आणि दहापेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या क्षेत्राला प्रवर्ग ३ अशी रचना केली आहे. यानुसार प्रवर्ग १ मध्ये ३२६,  प्रवर्ग २ मध्ये ८५ आणि प्रवर्ग ३ मध्ये १ अशी ४१२ प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

प्रत्येक विभागाचा आढावा

आठ ही विभागातील सहाय्यक आयुक्त किंवा विभाग अधिकारी यांच्यावर करोना नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पालिका आयुक्त आता दररोज प्रत्येक विभागाची माहिती घेणार असून आठवड्यामध्ये एकदा प्रत्येक विभागाला भेट देणार आहेत.