scorecardresearch

धरणाचे पाणी विकासकाच्या ओंजळीत: मोरबे धरणातील ८० टक्के पाण्याचे आरक्षण; बांधकाम प्रकल्प उभारण्यापूर्वीच विकासकावर मेहेरनजर

पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न बिकट बनला असताना या परिसरातील मोरबे धरण चक्क एका विकासकाच्या दावणीला बांधण्यात आल्याचे समोर येत आहे.

पनवेल: पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न बिकट बनला असताना या परिसरातील मोरबे धरण चक्क एका विकासकाच्या दावणीला बांधण्यात आल्याचे समोर येत आहे. शिरवली ग्रामपंचायत परिसरातील या धरणाचे ८० टक्के पाणी तीन वर्षांपूर्वी आरक्षित करणाऱ्या संबंधित विकासकाने या ठिकाणी प्रकल्पाची एक वीटही रचलेली नाही. याउलट या परिसरातील ३० गावे धरण उशाशी असतानाही तहानेने व्याकूळ आहेत.
पनवेलमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत सर्वच घरांमध्ये नळपाणी योजना पोहचविण्यासाठी पनवेल पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभागाचे सर्वेक्षण सुरू आहे. तालुक्यातील १२० गावांपैकी ९० गावांची पाहणी यश कन्स्टल्टन्सी या कंपनीने पूर्ण केली आहे. या गावांना सुमारे ४० दशलक्ष लीटर पाण्याची गरज लागणार असून त्यासाठी ८२ कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. हे ४० दशलक्ष लीटर पाणी आणायचे कुठून असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे. असे असताना शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील मोरबे धरणाचे पाणी मात्र शासनाने एका विकासकासाठी आरक्षित केल्याचे समोर आले आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी एका खासगी विकासकाने या धरणातील ८० टक्के पाणी आरक्षित केले आहे. त्यानुसार या विकासकाच्या बांधकाम प्रकल्पाला या धरणातून ८० टक्के पाणी उचलण्याची मुभा मिळणार आहे. विशेष म्हणजे, या बांधकाम प्रकल्पाला अद्याप सिडकोकडून मंजुरीही मिळालेली नसताना तीन वर्षांपूर्वी त्यांच्या प्रकल्पासाठी हे आरक्षण बहाल करण्यात आले.
१९७४ साली पनवेल तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत गारमाळ मोरबे धरण उभारण्यात आले. या पट्टय़ातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने हे धरण उभारण्यात आले होते. मात्र, कालांतराने येथील शेतीचे प्रमाण कमी झाल्याने धरणाच्या पाण्याचा त्यासाठीचा वापरही कमी झाला. याचाच फायदा घेऊन ग्रामपंचायतींकडून धरणातील पाणी आरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही मागणी नसल्याचे पाटबंधारे विभागाला दाखवण्यात आले. तसेच विकासकाच्या प्रकल्पाकडून पाणी आरक्षणासाठी अर्ज आल्याचेही दाखवण्यात आले, अशी माहिती या विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर दिली.
शेतीपेक्षा सध्या येथील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील होत चालला आहे. परिसरातील भूजलपातळी खाली गेली असून विंधणविहिरीना ५०० फुट खोल गेल्यानंतर पाणी लागत आहे. अशा वेळी धरणातील पाणीसाठय़ावर परिसरातील अनेक गावांची तहान भागू शकते. मात्र, हे पाणी आरक्षित झाल्याने ते गावकऱ्यांना कसे मिळणार, याचा पेच निर्माण झाला आहे. सध्या या धरणाचे गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू आहे.
शासनाकडून दुर्लक्ष
पनवेलमधील शिरवली, आंबा, वलप, चिंध्रण, म्हाळुंगी, मोरबे, कोंडले व शिरवली सह विविध १२ आदिवासीवाडय़ांना या धरणातील पाण्याचा वापर करुन गावात थेट पाणी पुरवठा जलकुंभाने जिल्हा प्रशासन करु शकते. धरणातील हे पाणी एका विकसकाला देण्याऐवजी सूमारे ३० गावांची तहान भागू शकेल. संबंधित विकसकाने कोणताही गृहप्रकल्प उभारला नसताना त्यांच्या प्रकल्पांना पाणी देण्याच्या निर्णयापूर्वी शासनाने स्थानिक गावक-यांची पाणी स्थिती का विचारत घेतली नाही असा प्रश्न गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dam water developer reservation morbe dam developer construction project amy