उरण : जेएनपीटीच्या कामगार वसाहतीमधील एका इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने प्रसंगावधानामुळे आई व मुलगा थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमुळे मात्र जेएनपीटी कामगार वसाहतीमधील शेकडो धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जेएनपीटी कामगार वसाहतीमधील सेक्टर – १, बी-टाईप ७० इमारतीमध्ये साईराज पाटील आई आणि बहिणीसोबत राहतात. वडिलांचे याआधीच निधन झाल्यानंतर हे कुटुंब अनेक वर्षांपासून या इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत. बेडरूमच्या छताला याआधीच तडे गेले होते.
गुरुवारी सकाळी छताचे प्लास्टर कोसळण्यास सुरुवात झाली, हा प्रकार झोपलेल्या आई व मुलाला लक्षात आल्याने ते तात्काळ तेथून बाहेर पडले. ते बाहेर पडताच छताचे मोठे प्लास्टर खाली कोसळले. थोडा जरी उशीर झाला असता तर दुर्घटना घडली असती. मात्र दैव बलवत्तर म्हणूनच सुदैवाने कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती साईराज पाटील यांनी दिली.
दुरुस्तीचे काम अर्धवट व निकृष्ट
जेएनपीटी कामगार वसाहतीमधील इमारतींच्या दुरुस्तीसाठी १५० कोटी खर्चाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे वसाहतीमधील इमारतींच्या दुरुस्तीचे काम
अर्धवट असतानाच थांबविण्यात आले आहे. या इमारतींच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. परिणामी वसाहतीमधील अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत, अशी माहिती जेएनपीटीचे माजी कामगार ट्स्र्टी तथा जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी दिली.