वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील प्रकार

नवी मुंबई :  करोनाकाळात तणाव झेलत काम करणाऱ्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी शवागारातून महिलेच्या मृतदेहाऐवजी एका तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

उमर फारुख शेख याचा मृतदेह ९ मे रोजी शवविच्छेदनासाठी  रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र, रुग्णालय कर्मचाऱ्यांनी करोना उपचारांच्या कामात उमर याच्या नातेवाईकांना आठ दिवसांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी या, असे सांगितले.

त्यानुसार उमर याचे नातेवाईक शनिवारी १६ मे रोजी शवागाराजवळ आले. परंतु,  रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. त्याप्रमाणे रविवारी नातेवाईक पुन्हा तिथे आले असता मृतदेह गहाळ झाल्याचे सांगण्यात आले.

यासंदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांत मृतदेह ‘बेपत्ता’ झाल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात असे आढळले, की मृत्युमुखी पडलेल्या एका महिलेच्या नातेवाईकांच्या ताब्यात उमर फारुख शेख याचा मृतदेह देण्यात आला.

दरम्यान, महिलेचा मृतदेह सध्या रुग्णालयाच्या शवागारातच आहे.  पोलिसांनी पुढील  तपासासाठी  मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीच्या हलगर्जीमुळे मृतदेह गहाळ झाला म्हणून गुन्हा नोंद करण्यात आल्याची  माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.