कर न भरणाऱ्या सदस्यांना ३१ मेपर्यंत अंतिम मुदत; २९ पैकी १४ सदस्यांकडून करभरणा

मालमत्ता कर न भरणाऱ्या पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांना कर भरण्याच्या नोटीसा पालिका प्रशासनाने पाठवल्या होत्या.

पनवेल : मालमत्ता कर न भरणाऱ्या पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांना कर भरण्याच्या नोटीसा पालिका प्रशासनाने पाठवल्या होत्या. याची मुदत ३१ मे पर्यंत आहे. काहींनी कर भरला आहे. मात्र काहींनी अद्याप कर भरणा केलेला नाही. नोटीस दिल्यापासून तीन महिन्यांपर्यंत थकीत मालमत्ता कर न भरल्यास महापालिका अधिनियमाप्रमाणे विद्यमान पालिका सदस्य भविष्यातील निवडणूक लढवू शकणार नाहीत, असा नियम आहे.  यावर भाजपच्या  बंडखोर नगरसेविका यांनी पूर्वलक्ष्यी प्रभावाने लावलेला कर अन्यायकारक असून तो भ्रणार नाही अशी आपली भूमिका कायम ठेवली आहे.

पनवेल पालिकेने थकीत मालमत्ता करासह कर वसुली सुरू केली आहे. मात्र याला विरोध होत असून  कर भरण्यास मालमत्ताधारक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. मालमत्ता करातून गेल्या दोन वर्षांत ६७५ कोटी रुपयांची अपेक्षा होती. मात्र ८० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर याच विरोधामुळे वसूल होऊ शकला नाही. कर न भरणाऱ्यात विद्यमान नग्रसेवकांचाही समावेश आहे. नगरसेवकच कर भरणार नसतील तर सामान्य कसे भरतील असा प्रश्न उपिस्थत होत होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने कर न भरणाऱ्या नगरसेवकांना कर भरण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात या विशेष नोटीस पाठवण्यात आल्या

होत्या. यानंतर अनेक सदस्यांनी त्यांचा कर भरला आहे. ग्रामीण भागातील पालिका सदस्यांना कराची देयके न मिळाल्याने त्यांनी कर भरण्याचा मुद्दा चर्चेत आलाच नाही. पालिका आयुक्तांनी दिलेल्या नोटिशीचा काळ ३१ मे रोजी संपणार आहे. मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांना पालिकेची निवडणूक लढविता येत नसल्याची तरतूद महापालिका अधिनियम १० व ११ मध्ये आहे. त्यामुळे पालिकेचा करच भरला नाही तर पालिकेत नागरिकांचे नेतृत्व करण्याची संधी कशी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ही लढाई लीना गरड यांची एकटय़ाची नाही. एकटय़ाचा मालमत्ता कर भरायचा असता तर कधीच भरला असता. पूर्वलक्ष्यी प्रभावाने लावलेला अन्यायकारक कराविरोधात माझा लढा सुरू आहे. मला राजकारणतून संपविण्याचा सर्वच स्तरातून प्रयत्न सुरु केला आहे. जनता सर्वश्रुत असून आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन हा प्रश्न मांडू. जनतेच्या हितासाठी माझी ही भूमिका आहे. 

– लीना गरड, सदस्य, पनवेल पालिका

पनवेल पालिकेने २९ पालिका सदस्यांना मालमत्ता कराची देयके दिली आहेत. मात्र ज्यांनी कर भरला नाही अशांना कर विहित वेळेत भरावा म्हणून नोटीस दिल्या होत्या. यापैकी १४ सदस्यांनी त्यांचा कराचा भरणा केला आहे. तसेच अजूनही मालमत्ता करासंदर्भात हरकती व सुनावणी ज्या परिसरात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे अशा ३१ जणांना कराची देयक देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

-गणेश शेटय़े, उपायुक्त, पनवेल पालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deadline non paying members till 31st may tax payment member ysh

Next Story
नवी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; उच्च अधिकाऱ्यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशीची आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी
फोटो गॅलरी