नवी मुंबई: नवी मुंबईतही पावसाळय़ात काही ठिकाणी पाणी तुंबण्याच्या जागा वाढत आहेत. तसेच वृक्षांचीही मोठी पडझड होत असते. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावीत यासाठी महापालिका प्रशासनाने यावर्षी १५ मेपर्यंतच सर्व कामे उरकण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या वर्षी ३१ मे ही तारीख देण्यात आली होती, मात्र या तारखेनंतरही शहरात कामे सुरू होती. त्यामुळे या वर्षी नियोजन करण्यात आले आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई शहरात बऱ्याच ठिकाणी, महामार्गावर पाणी साचले होते. पावसाळय़ापर्यंत कामे सुरू राहत असल्याने ऐनवेळी तारांबळ उडते. त्यामुळे वेळेत कामे पूर्ण होण्यासाठी यंदा १५ मे ही मुदत देण्यात आलेली आहे. यासाठी १५ एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
शहरातील बंदिस्त व नैसर्गिक नाल्यांमधील गाळ काढणे, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्त्यांची मलमपट्टी, वृक्ष छाटणी, मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई, आरोग्य सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत.
नवी मुंबईत पाण्याचा निचरा होण्यासाठी धारण तलाव उभारण्यात आले आहेत. मात्र गेली १५ वर्षांपासून या तलावांतील गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या तलावांची क्षमता कमी झाली आहे. तलावांत मोठय़ा प्रमाणात कांदळवन वाढल्याने त्याची स्वच्छता करता येत नाही. यासाठी महापालिकेने एमसीझेडएमएकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे या वर्षी पावसाळापूर्व तलावांची स्वच्छता होईल आशी आशा होती, मात्र त्यांच्याकडून अद्यापही हा विषय पटलावर घेण्यात आला नाही.
मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, शेवटपर्यंत कामे बाकी राहू नये म्हणून यावेळी १५ मेपर्यंत मान्सूनपूर्व कामे करण्याचे नियोजन आहे. धारण तलाव स्वच्छता विषय मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. जेणेकरून मान्सूनपूर्व कामांत धारण तलावाचीही स्वच्छता करता येईल.-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका