दररोज शेकडो गाडय़ा मोकळ्या भूखंडांवर रित्या; सिडको, एमआयडीसीचे दुर्लक्ष

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील डेब्रिज राजरोसपणे नवी मुंबईतील मोकळ्या भूखंडांवर टाकले जात आहे. डेब्रिज माफियांचे लागेबांधे अतिक्रमण विाभागातील अधिकाऱ्यांशी असल्यामुळे ते डंपर आणून ठरलेल्या ठिकाणी ते रिकामे टाकून निघून जातात. शहरातील सिडको व एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात आल्यामुळे शहर विद्रूप झाले आहे.

डेब्रिजचा प्रश्नावर महापालिकेच्या महासभा, स्थायी समितीच्या सभांमध्ये वारंवार गाजतो, मात्र आधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळे डेब्रिज माफियांवर कारवाई तर दूरच त्यांची साधी चौकशी करण्याचेही सौजन्यही दखवले जात नाही. एका विरोधीपक्ष नेत्याला धमकवण्यापर्यंत या डेब्रिज माफियांची मजल गेली होती. एका वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यालादेखील डेब्रिज माफियांच्या सापळ्यात अडकल्याने खात्याअंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागले होते. १० गाडय़ांचे परवाने काढून यावर शेकडो गाडय़ा नवी मुंबईत रित्या करण्याचा गोरख धंदा सुरू असतो. नवी मुंबईतील खाडीकिनारी व मोकळ्या भूखंडांवर भरावच्या नावाखाली डेब्रिज टाकले जाते. पामबीचच्या अंतर्गत रस्त्यावर रेल्वे मार्गालगत डेब्रिजचे ढीग साचले आहेत. वाशी ते नेरुळ पामबीच मार्गावर खाडीकिनारी व घणसोली खाडीकिनाऱ्यालगत बनत असलेल्या नवीन मार्गावर डेब्रिज टाकले जात आहे. कोपरखरणे सेक्टर १९ परिसरातदेखील डेब्रिज टाकले आहे. शिरवणे परिसरात सर्रासपणे टाकल्या जात असलेल्या डेब्रिजबद्दल स्थायी समितीच्या सभेत जाब विचारणाऱ्या नगरसेविकेला प्रशासनाने दाद दिली नव्हती. ऐरोली सेक्टर १९, २० येथील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकले जात आहे. दिघा येथील मुकुंद कंपनीच्या परिसरात डेब्रिजच्या गाडय़ा रिकाम्या केल्या जातात. घणसोली मधील मुख्य नाल्यानजीक डेब्रिज टाकण्यात आले आहे. कोपरखरणे तलावाच्या बाजूला डेब्रिजचे ढीग पडले आहेत. कोपरखरणे खाडी परिसर, नेरुळ, सीवुड्स, पामबीच, एमआयडीसी परिसरातील मोकळ्या भूखंडांवर तसेच एमआयडीसी जलवाहिनीला लागूनच डेब्रिज टाकले जाते.

डेब्रिज टाकण्याच्या परवान्यामध्ये नमूद केलेला पत्ता आणि प्रत्यक्षात मात्र डेब्रिज टाकण्याचे ठिकाण वेगळेच असते. महापे येथे एका भूखंडावर डेब्रिज टाकण्याची परवानगी पालिकेने दिली आहे, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी एमआयडीसीच्या उपअभियंताचे कार्यालय आहे. ही बाब उघड झाल्यानंतरदेखील संबधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

डेब्रिजमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रोगराई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या डेब्रिजमुळे साचून राहते. त्यामुळे सुस्थितीतील भूखंडाची अवस्था दयनीय होते. सिडको व एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात येत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण पथकाने त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

प्रशासन व स्थानिकांशी हातमिळवणी

डेब्रिजच्या गाडय़ा ऐरोली व मानखुर्दमार्गे उरणला जात असल्याचे भासवून नवी मुंबई पालिकेच्या हद्दीत रिकाम्या केल्या जातात. एमआयडीसीमध्ये मोकळ्या भूखंडावर हे डेब्रिज टाकण्यासाठी प्रशासन व स्थानिकांशी हातमिळवणी केली जाते. पालिकेने नावापुरती ३० ते३५ वाहने जप्त केली होती. या वाहनांचा परवाना संपल्याचेदेखील कारवाईदरम्यान समोर आले होते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना डेब्रिज माफियांकडून लाच घेतल्यामुळे निलंबित करण्यात आले होते, मात्र बडय़ा आधिकाऱ्यांना याची झळ बसत नसल्याने नवी मुंबईमध्ये डेब्रिज माफिया धुमाकूळ घालत आहेत. मुंबईतील डेब्रिज कचऱ्याच्या नावाखालीदेखील नवी मुंबईत आणले जाते. मुंबई महापालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या गाडीतून अशाच पद्धतीने डेब्रिज आणण्यात आले होते.

सिडको व एमआयडीसी प्रशासनाला वांरवार मोकळ्या भूखंडांवर टाकण्यात येत असलेल्या डेब्रिजची माहिती देण्यात येते. पत्रव्यवहार करूनदेखील सिडको व एमआयडीसी प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. पालिका डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करते पण सिडकोने व एमआयडीसीनेदेखील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका