लोकसत्ता टीम

पनवेल : कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीच्या कार्यालयामध्ये छताचा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यावेळी कार्यालय बंद असल्याने कोणीही या घटनेत जखमी झाले नाही.

५४ कोटी रुपयांचा अपहार झालेल्या कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजार समितीचा कारभार सध्या जोरदार चर्चेत आहे. आशियाखंडातील सर्वात मोठी लोखंड व पोलादाची बाजारपेठ कळंबोली येथे असल्याने या समितीच्या कार्यालयाचे महत्व अधिक आहे. मात्र या समितीमध्ये झालेल्या संशयास्पद कारभारामुळे समिती वादाच्या भोव-यात अडकली आहे. बाजार समितीचे कार्यालय सध्या ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत जिर्ण अवस्थेमध्ये आहे. मंगळवारी रात्री बाजार समितीचे कार्यालय असलेल्या छताला अंतर्गत केलेल्या सजावटीचा भाग कोसळला. याच इमारतीमध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय आहे.

आणखी वाचा-माता बाल रुग्णालय लवकरच! कोपरखैरणे नागरिकांची आरोग्य सेवेची प्रतीक्षा संपुष्टात

सध्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाला सुद्धा लोखंडी टेकू लावण्यात आले आहेत. लोखंड पोलाद बाजार समितीने २०१७ साली कार्यालयाचे सजावटीचे काम केले होते. मंगळवारी झालेल्या पडझडीनंतर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतल्याची माहिती बाजार समितीचे कार्यकारी अधिकारी अमिष श्रीवास्तव यांनी दिली. जीर्ण इमारत कोसळण्यापूर्वी सरकारी कार्यालये सूरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी दोन्ही सरकारी कार्यालयाकडून होत आहे. या दोन्ही सरकारी कार्यालयांचे प्रमुख जागेच्या शोधात आहेत. मात्र सरकारी भाडेदरात प्रशस्त जागा सापडत नसल्याने जीव मुठीत घेऊन सरकारी कर्मचारी व अधिकारी धोकादायक इमारतीमधून काम करत आहेत.