नवी मुंबई: शहरात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे पालिका प्रशासनाचा ताण काहीसा कमी झाला आहे. काही महिन्यांपूर्वी दिवसाला सरासरी १० हजार चाचण्यांचे प्रमाण मे महिन्यात ५ हजारांपर्यंत कमी झालेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत अशीच नव्या रुग्णांची संख्या कमी झाली तर चाचण्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
नवी मुंबई शहरात मार्च २०२० पासून करोनाचा शिरकाव झाल्यापासून प्रशासनावर प्रचंड ताण होता. पहिल्या लाटेत फेब्रुवारीपर्यंत स्थिती अत्यंत नियंत्रणात होती. रोजची नवी रुग्णसंख्या ५० पर्यंत आली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्या लाटेचा शहराला तडाखा बसला. दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेतील संख्या दुपटीने वाढली त्यामुळे नागरीकांना खाटाच उपलब्ध होत नसल्याची स्थिती निर्माण झाली. पालिकेनेही पुन्हा खाटांची संख्या वाढवली तरीही अत्यावश्यक खाटा व जीवरक्षक प्रणाली खाटांची संख्या तोकडी पडू लागल्याने रुग्णांचे व नातेवाईकांचे चांगलेच हाल झाले होते. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेने शहरात चाचणी केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली होती. एकंदरीतच शहरातील करोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने दिवसाची करोना चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे.




नवी मुंबई शहरात सद्य:स्थितीला करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पुन्हा संख्या ५० च्या जवळपास येऊ लागली आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. वर्धक मात्रा अधिकाअधिक देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.- अभिजीत बांगर, आयुक्त
करोना चाचण्यांची आठवडाभरातील स्थिती…
दिनांक चाचण्यांची संख्या
१२ जुलै – ५३५१
१३ जुलै- – ४१५९
१४ जुलै- ५७५१
१५ जुलै- ५०४०
१६ जुलै- ४७३३
१७ जुलै — ८१९
१८ जुलै – ६०६४
१९ जुलै- ५६४५