नवी मुंबईतील मलेरिया व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी १२५ हून अधिक शिबिरे घेण्यात येणार आहेत.महापालिकेच्या वतीने शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशी २१ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत शहरातील विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर खासगी शाळा, महापालिका शाळा यांच्यामध्ये जनजागृती रॅली काढून आजार नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. महापालिकेने आजारांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शहरात महत्वाच्या ठिकाणी हस्तपत्रके, जाहिरात फलक यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली जाणार आहे. हिवताप व संशयित रुग्ण आढळल्यास त्याच्या तपासणीसाठी महापालिकेच्या विविध नागरी केंद्रांमध्ये विशेष तपासणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. डासांची उत्पत्ती होणाऱ्या परिसरामध्ये  महापालिकेच्या माध्यमातून औषध फवारणी करण्यात येणार आहे

नवी मुंबईत डेंग्यूचे ६५ रुग्ण आढळले आहेत, तर १६५ जणांना मलेरियाची लागण झाली आहे. स्वाइन फ्लूचे १४१ रुग्ण आढळले आहेत. आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास पालिका रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.

– डॉ. उज्ज्वला उतुरकर, वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका