scorecardresearch

Premium

नवी मुंबईत देशमुख टोळी पुन्हा सक्रिय

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये देशमुख टोळीतील सदस्यांनी खंडणीसाठी पुन्हा राजकीय मंडळींना लक्ष्य केल्याने दोन वेगवेगळे खंडणीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

Deshmukh gang active
नवी मुंबईत देशमुख टोळी पुन्हा सक्रिय (प्रातिनिधिक छायाचित्र)

पनवेल : नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्या कारकिर्दीत विकी देशमुख टोळीच्या म्होरक्याला कोठडीत डांबल्यानंतर ही टोळी निष्क्रीय झाल्याने अनेक व्यापाऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा ही टोळी सक्रिय झाली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या टोळीतील सदस्यांनी खंडणीसाठी पुन्हा राजकीय मंडळींना लक्ष्य केल्याने दोन वेगवेगळे खंडणीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एका घटनेत रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्षाकडून ३५ हजार रुपयांची खंडणी मागितली, तसेच दूसऱ्या घटनेत भाजपाच्या माजी नगरसेवकिच्या पतीकडून ७५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. या माजी नगरसेविकेचा पती माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या कंपनीत कामाला असल्याने पनवेलमध्ये देशमुख टोळी पुन्हा सक्रिय झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

नवीन पनवेल येथील भाजपाच्या माजी नगरसेविका यांच्या पतीला ७५ लाख रुपये द्या तूमच्या कुटुंबाला कायमची सूरक्षा पुरवतो, असे फोनवरून धमकी देणाऱ्याने सांगितले. ज्यांना ही धमकी मिळाली ते ठाकूर इन्फ्रा प्रा.लिमीटेड या परेश ठाकूर यांच्या कंपनीत काम करतात. परेश ठाकूर यांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. सध्या हे पीडित कुटुंब देशमुख टोळीच्या दहशतीखाली आहे. गव्हाण कोपर गावात राहणाऱ्या या कुटुंबाला धमकविताना टोळीतील सदस्याने त्याच गावातील इतरांकडूनही खंडणी घेतल्याची माहिती दिली. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दूसऱ्या घटनेत रिपब्लिकन सेना या पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड यांनाही ३५ हजार रुपयांची खंडणी बाबू नावाच्या व्यक्तीने मागितली. कळंबोली वसाहतीमध्ये फेस्टीवलचे आयोजन गायकवाड यांनी केले आहे. या फेस्टीवलमध्ये लागणाऱ्या दुकानांमुळे ही खंडणी मागितली जात असल्याचे तक्रारीत गायकवाड यांनी म्हटले आहे. या प्रकरणी गंभीर दखल घेत कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी खंडणी आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गायकवाड यांनाही देशमुख याचे नाव घेऊन धमकाविण्यात आले. या दोन्ही प्रकरणातील संशयित फरार आहेत.

four thousand bmc health workers warned of agitation on october 4
मुंबई: आरोग्य सेविकांचे पुन्हा ठिय्या आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी ४ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा
communist party secular organizations on fast to save national unity and constitution in uran
उरण मध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान वाचवासाठी उपोषण; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि संघटना आयोजक
mns mla raju patil slams corrupt kdmc officials over pothole
“गणपतीसाठी चांगला रस्ता न बनविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीत…”, राजू पाटील यांची टीका
st employees union called off indefinite hunger strike after minister uday samant promise on demand
एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे; उद्योगमंत्री उदय सामंतांकडून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन

हेही वाचा – रायगड : समाजातील लुटारूपासून सावध व्हा; माजी आमदार चंद्रशेखर प्रभू यांचे प्रकल्पग्रस्तांना आवाहन

सराईत गुंड पोलीस कोठडीत असताना त्याच्या टोळीतील फरार सदस्य व्यापारी, उद्योजक यांना धमकावत असल्याने नवी मुंबईतील व्यापारी व उद्योजक पुन्हा एकदा धास्तावले आहेत. नवी मुंबई पोलीस दल प्रामाणिक असले तरी सुरक्षेचे कडे किती कमकुवत आहे याचे या दोन्ही घटना प्रतिक आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे लक्ष पोलीस दलाला शिस्त लावण्यात आणि काळेधंदे कायमचे बंद करण्यात लागले आहे. सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात संशयित आरोपींना अटक करू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. अशा प्रकरणातील संशयित आरोपींना सीआरपीसीअंतर्गत संशयितची नोटीस देऊन सोडल्याने गुन्हा केला तरी काहीही होत नाही, अशी भावना गुन्हेगारांमध्ये बळावत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. पोलीस प्रामाणिक पाहिजे की गुन्हेगारांवर वचक असणारा असा पेच सामान्य नागरिकांसमोर उभा आहे. याच परिस्थितीचा फायदा उचलत विकी देशमुख टोळीतील सदस्य फरार राहून सामान्य नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. गेले अनेक महिने देशमुख पोलीस कोठडीत असला तरी त्याची दहशत कमी होण्यापेक्षा अधिक वाढली. पोलिसांना विकीने लपवलेले मोठे घबाड अजूनही सापडले नाही. त्याच्या टोळीतील फरार सदस्यांपर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत. यामुळे कोठडीत बंद असलेल्या विकीची टोळी कोण चालवितो, असा नवा प्रश्न पोलिसांना सतावत आहे.

हेही वाचा – उरण: पिरवाडी बीच हाऊसफुल्ल, सुट्टीमुळे पर्यटकांची पावले समुद्र किनाऱ्यावर

आम्ही घाबरणार नाही. खंडणीतर मुळीच देणार नाही. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह पोलीस दलावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारांवर आम्हा दलितांचा अजूनही विश्वास कायम आहे. रिपब्लिकन सेना रायगडमधील ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सरसावली आहे. त्यामुळे जिवाची फिकीर न करता आम्ही गुन्हेगारांविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी त्यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. आज आमच्याकडून खंडणी मागितली जाते तर सर्वसामान्यांचे काय होईल, असे रायगड जिल्हा, रिपब्लिकन सेना, जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deshmukh gang active again in navi mumbai ssb

First published on: 10-04-2023 at 12:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×