नवी मुंबई : कोकणात यंदा पावसाने ओढ दिल्याने आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत असताना देवगडच्या हापूसने मात्र ऑक्टोबरमध्येच वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत (एपीएमसी) हजेरी लावली आहे. नियमित हंगाम सुरू होण्यास अद्याप काही महिने बाकी असतानाच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग परिसरातून हापूस आंब्याची पहिली पेटी शुक्रवारी (३० ऑक्टोबर) मुंबई एपीएमसीच्या फळ बाजारात दाखल झाली. मिलेश बांदकर या शेतकऱ्याने प्रतिकूल हवामानात मोहोराचे संगोपन करून पिकवलेल्या सहा डझन आंब्यांच्या पेटीचे बाजारात पूजन करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीतही आंबा उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यंदा कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आंब्याच्या मोहोराचे संगोपन करणे मोठे आव्हान होते. जून-जुलैमध्ये आलेला मोहोर टिकवून ठेवण्यासाठी बांदकर यांनी विशेष प्रयत्न केले. मोहोर आलेल्या झाडांवर छप्पर उभारणे, बुरशीनाशकांची फवारणी करणे आणि आवश्यक औषधोपचार करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या. विशेषतः पाऊस आणि प्रतिकूल हवामानापासून मोहोराचे संरक्षण करण्यासाठी सातत्याने देखभाल करावी लागली. या प्रयत्नांमुळे मोहोर टिकून राहिला आणि त्यातून ऑक्टोबरमध्येच आंब्याचे उत्पादन घेणे शक्य झाले.

गिर्ये-रामेश्वर परिसरात राहणाऱ्या बांदकर यांच्या बागेत सुमारे एक हजार ते अकराशे आंब्याची झाडे आहेत. स्वतःच्या बागेतील झाडांबरोबरच त्यांनी काही झाडे करारानेही घेतली आहेत. मात्र, मुंबई एपीएमसी बाजारात दाखल झालेली पहिली पेटी त्यांच्या स्वतःच्या बागेतील आंब्यांची आहे. गुरुवारी संकष्टीच्या मुहूर्तावर ही पेटी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. त्यांचे बंधू विद्याधर बांदकर यांचाही या आंबा व्यवसायात सहभाग असून कुटुंबीयांच्या सहकार्याने बागेचे व्यवस्थापन केले जाते.

मुंबई एपीएमसी बाजारातील जनार्दन अँड कंपनी या व्यापाऱ्यांकडे ही पहिली पेटी विक्रीसाठी दाखल झाली. अभिजीत भुजबळ आणि सोन्या बापू भुजबळ यांच्याकडे विक्रीसाठी हे आंबे पाठवण्यात आले होते. सध्या सहा डझनांच्या पेटीचा दर २५ हजार रुपयांपेक्षा अधिक राहण्याचा प्राथमिक अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र, पुढील काळात आवक वाढल्यानंतर दरात बदल होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, पहिली पेटी बाजारात पाठवल्यानंतर हा प्रयोग पुढेही सुरू ठेवण्याचे नियोजन बांदकर यांनी केले आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आणखी सहा ते सात पेट्या एपीएमसी बाजारात पाठवण्याचे नियोजन आहे. या पेट्या प्रत्येकी पाच डझन क्षमतेच्या असतील. दोन वर्षांपूर्वीही त्यांनी नोव्हेंबर महिन्यात एपीएमसी बाजारात हापूसची पेटी पाठवली होती. यंदा मात्र ऑक्टोबरमध्येच उत्पादन घेऊन त्यांनी पुन्हा एकदा हंगामापूर्वी आंबा बाजारात आणण्याचा प्रयोग केला आहे. त्यामुळे आगामी पेट्यांना बाजारात किती दर मिळतो, याकडे आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.