scorecardresearch

गणेशाच्या स्वागताला ढोल-ताशाचा गजर

मुंबईतील रंगारी बदक चाळ या सार्वजनिक गणेशशोत्सव मंडळाला प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहेत.

dhol tasha groups
महिलांनी स्वत:हून पुढाकर घेऊन ढोल वादन करायला सुरुवात केली आहे.

नवी मुंबईतील पथकांचा सराव पूर्ण; मिरवणुकीचे नियोजन सुरू; महिलांच्या सहभागात लक्षणीय वाढ

गणेशोत्सव तोंडावर आला असताना नवी मुंबईतील ढोल-ताशा पथकांचा सराव पूर्ण झाला असून आता मिरवणुकीत काय नावीन्य आणावे यावरील चर्चाना वेग आला आहे. महिलांचा सहभग लक्षणीय आहे.

पुणे, ठाणे, मुंबईप्रमाणे नवी मुंबईतही अनेक ढोल-ताशा पथके गेल्या काही वर्षांत स्थापन झाली आहेत. वर्षांगणिक त्यांतील वादकांची विशेषत महिलांची संख्या वाढू लागली आहे. खारघर येथील उत्सव ढोल ताशा पथक आणि ऐरोलीतील मल्हार ढोल ताशा पथकात यंदा महिलांचा सहभाग वाढला आहे. नववर्ष स्वागतयात्रा असो की गणेशाचे आगमन, विसर्जन शहराच्या विविध भागांतून बोलावणे येत असल्याचे पथकातील ढोलवादक सांगतात.

खारघर येथील उत्सव ढोल ताशा पथक हे २०१५मध्ये स्थापन झाले. या पथकात ७०% मुली आहेत. गेल्या वर्षी १२० जणांच्या पथकात ३० ते ४० मुलींचा सहभाग होता. यंदा १५० जणांच्या पथकात ६०ते ७० मुली आहेत हे पथक यंदा ११ नवीन ताल सादर करणार आहे. महिलांकरिता नऊवारी साडी आणि पुरुषांसाठी फेटा हा पेहराव ठेवण्यात आला आहे. मुंबईतील रंगारी बदक चाळ या सार्वजनिक गणेशशोत्सव मंडळाला प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहेत. या पथकाने गेल्या वर्षी पुणे, मुंबईत ढोलवादन केले आहे. यंदा या पथकाला आता १३ ठिकाणांहून बोलावणे आहे आहे. येत्या वर्षभरात १००% महिलांनी सहभाग असलेले महिला ढोलपथक स्थापन करण्याचा मानस पथक प्रमुख व्यक्त करतात.

ऐरोली येथील मल्हार पथक २०१६मध्ये स्थापन झाले. गेल्या वर्षी या पथकात अवघ्या ८ मुली होत्या यंदा त्यांची संख्या ६०च्या घरात पोहोचली आहे. या पथकामधील बहुतेक वादक हे उच्च शिक्षण घेत आहेत. कॉलेजचा अभ्यास सांभाळून रोज सायंकाळी ते सरावासाठी हजर होतात. यंदा ढोल पथकांसाठी ७० ते ९० डेसीबल एवढी ध्वनिमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ती पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे हे वादक सांगतात.

यंदा आमच्या उत्सव ढोल ताशा पथकामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. महिलांनी स्वत:हून पुढाकर घेऊन ढोल वादन करायला सुरुवात केली आहे.

– आशिष बाबर, उत्सव पथक

मल्हार ढोल ताशा पथकात मुली स्वत:हून नावनोंदणी करीत आहेत. यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विशेषत अभियांत्रिकी शाखेतील मुलींचा जास्त सहभाग आहे.

अमित अगवणे, मल्हार पथक

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-08-2017 at 03:17 IST

संबंधित बातम्या