पनवेल – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि प्रकल्पग्रस्तांच्या गटाने बुधवारी सकाळी काढलेला विधिमंडळ मोर्चा पोलिसांनी पनवेलमध्येच रोखला. आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद तसेच झटापट झाली. या घटनेमुळे पनवेलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. येथून मुंबईतील विधिमंडळावर पायी मोर्चा नेण्याची आंदोलकांची तयारी होती. मात्र आंदोलन सुरू होताच पनवेल शहर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून हटवत ताब्यात घेतले.

या आंदोलनाचे नेतृत्व खासदार सुरेश म्हात्रे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले. आंदोलकांनी नियमानुसार परवानगी मागितली होती, मात्र ती नाकारण्यात आल्याने सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दि. बा. पाटील नामकरणाच्या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

या आंदोलनाला महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा पाठिंबा नव्हता. त्यामुळे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सरकारने ते दडपल्याचा आरोप माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला.गेल्या दोन आठवड्यांपासून पनवेल आणि उरण परिसरातील गावांमध्ये बैठका घेऊन या आंदोलनाची तयारी सुरू होती. यापूर्वी रश्मिता पोपेटा यांनी केलेल्या उपोषणानंतर दि. बा. पाटील नामकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. त्यानंतर विधिमंडळावर पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पोलिसांनी मोर्चा रोखल्याने प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला.

“यापूर्वीही रायगडमध्ये अनेक आंदोलने केली आहेत. सर्व आंदोलनांना परवानगी मिळतेच असे नाही. मात्र यावेळी पोलिसांची भूमिका दडपशाहीची असून ती निषेधार्ह आहे. आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत,” – बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप