भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ११ ते १४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वाशी सेक्टर ३० येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये चार दिवस चालणाऱ्या सोहळ्याचे उद्घाटन ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता माजी मंत्री गणेश नाईक याच्या हस्ते होईल.
दुपारी १ वाजता दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे हे डॉॅ. आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पलूंबाबत माहिती देणार आहेत. त्यानंतर खादी ग्रामोद्योगाचे माजी व्यवस्थापकीय संचालक के. डी. कांबळे यांचे ‘डॉ. आंबेडकर आणि उद्योग विचार’ या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी ३ वाजता महात्मा जोतिबा फुले यांचे शिल्प व चित्र प्रात्यक्षिक नामवंत चित्रकार व शिल्पकार साकारणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता आंबेडकरांच्या जीवनावर आधरित ‘द ट्र सन ऑफ इंडिया’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. त्याचप्रमाणे १२ एप्रिल रोजी सकाळी ११पासून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे चित्र व शिल्प सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकारांकडून साकारण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. किशोर गायकवाड हे बाबासाहेबांच्या जीवनावार तसेच के.ई.एम. रुग्णालयाचे विभागप्रमुख डॉ.आर.आर.शिंदे आरोग्य विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता वेध थिएटर निर्मित ऐतिहासिक महानाटय़ राजा सम्राट अशोक सादर होणार आहे.