गेल्या १७ वर्षांपासून वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा- बटाटा बाजराचा पुर्नविकास खोळंबला आहे. सन २००५ पासून धोकादायक इमारतीत समाविष्ट होणाऱ्या कांदा बटाटा बाजराची यंदा पुनर्बांधणी होईल अशी अपेक्षा होती, मात्र अद्याप नुसत्या बैठकांवर बैठका होत असून पूर्णविकासाचा चेंडू सरकण्याचे नाव घेत नाही. आजमितीस जीर्ण झालेल्या इमारतीत व्यापारी जीव मुठीत धरून व्यवसाय करीत आहेत. केवळ बैठकांवर बैठका होत असून त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने बैठकांना व्यापारी पुरते त्रस्त झाले आहेत.

सन १९८२ मध्ये कांदा बटाटा बाजार इमारतीची उभारणी करण्यात आली होती. या बाजार आवारातील इमारतीची बांधणी ही सिडकोनिर्मित असून २००५ पासून वर्षानुवर्षे नवी मुंबई महानगरपालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट होत आहे. प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम रखडले आहे. एपीएमसी प्रशासनाकडे पुनर्विकास करण्यासाठी आर्थिक ऐपत नसल्याने खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधा आणि वापरा तत्वावर पुनर्बांधणी करण्याची चर्चा आहे. काही व्यापारी वर्ग याला सहमत आहेत तर काही व्यापाऱ्यांची संमती नाही.

हेही वाचा : पनवेल : खांदेश्वरमधील वीजग्राहक 12 तासांपासून वीजेविना

आमचे स्वतः मालकीचे गाळे असताना नवीन इमारती बांधकामात वरचे मजले इतर कोणाला का वापरून देयायचं? आम्हालाच दोन मजली इमारत बांधून द्या अशी मागणी काही व्यापारी करीत आहेत, तर आता जशी बाजार समितीची बांधणी आहे त्याच पद्धतीने पुर्नविकास करून द्या अशी मागणी व्यापारी करीत आहेत. बाजाराच्या पुनर्विकासाबाबत अशा चर्चेच्या फक्त बैठका होत असून अद्याप काही निर्णय होत नाही,त्यामुळे व्यापारी पुनर्विकासाला कंटाळे असून याठिकाणी जीवित हानी झाल्यावरच कांदा- बटाटा बाजाराचा पुनर्विकास होणार आहे का? असा प्रश्न व्यापारी विचारत आहेत.

हेही वाचा : नवी मुंबई : पितृपक्ष पंधरवडा सुरू मात्र भाज्यांची मागणी मंदावली

पुनर्बांधणी राजकारणाच्या कचाट्यात?

मुंबई कृषी उत्पन्न कांदा- बटाटा बाजाराचा पुनर्विकास हा खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधा आणि वापरा तत्वावर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजाराची व्यापाती मोठी आहे. या बाजार समितीत एकूण २०० ते २५०गाळे आहेत. येथील व्यापारी वर्ग पुनर्विकासात वाढीव एफएसआय द्यावा अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे प्रकल्प मोठा असून आर्थिक बळकटी असलेलाच विकासक ही पुनर्बांधणी करू शकतो. त्यामुळे बडे नामांकित खासगी विकासक बाजराच्या पुनर्बांधणीसाठी पुढे आले आहेत. मात्र येथील राज्यकर्ते आपली राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असून ते उद्दिष्ट साध्य होत नसल्याने प्रकल्पाच्या बांधणीला हिरवा कंदील मिळायला विलंब होत आहे असा आरोप व्यापारी मनोहर तोतलानी,अमित घोलप यांनी केला आहे.