नवी मुंबई : समुद्र सपाटीपासून आठ मीटर खाली असलेल्या नवी मुंबईत अतिवृष्टी काळात पाणी साचण्याच्या घटना दरवर्षी होत असून पालिकेने पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी यंदा अतिरिक्त पंपांची व्यवस्था केली होती. पण पहिल्याच मुसळधार पावसाने ही सर्व यंत्रणा पाण्यात गेल्याचे दाखवून दिले. त्यामुळे शहरातील आठ भुयारी मार्गांना डबक्याचे स्वरूप आले होते. ठाणे-बेलापूर मार्गावरील चार उड्डाणपुलांवर दोन ते तीन वर्षांतच खड्डे पडल्याचे चित्र आहे. घणसोली उड्डाणपुलावर या खड्यांची संख्या जास्त असून एमएमआरडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवी मुंबई शहर हे खारजमिनींवर मातीचा भराव टाकून निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे लोक आग्रहास्तव तयार करण्यात आलेले भुयारी मार्ग जमिनीपासून पाच ते सहा फुटांचे खड्डे खोदून तयार करण्यात आले आहेत. नागरी वसाहत आणि औद्योगिक वसाहत यामधील वाहतूक दुवा असलेला हा भुयारी मार्ग रेल्वे स्थानकांच्या जवळ असल्याचे दिसून येते. त्यामुळे ऐरोलीतील दोन, रबाले, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, वाशी, या रेल्वे स्थानकांबाहेर असलेले भुयारी मार्ग हे पहिल्याच मुसळधार पावसात पाण्यात गेल्याचे चित्र होते. ही स्थिती दरवर्षी उद्भवत असल्याने महापालिकेने यंदा दरवर्षी पेक्षा जास्त पंप तयार ठेवण्याचा निर्णय घेतला आहे पण हे साचलेले पाणी उपसण्यासाठी ठेवण्यात आलेले पंपही पाण्यात गेल्याचे दिसून आले.
सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने ऐरोली सेक्टर चार, बेलापूर सेक्टर चार, तुर्भे एनएमएमटी आगारासमोर, महापे जंक्शन या ठिकाणी मंगळवारी पाणी साचलेले दिसून आले. पहिल्याच पावसाने पालिकेच्या उणिवा दाखवून दिल्या आल्या आहेत.

धारण तलाव

नवी मुंबई खाडीकिनारी वसलेले असल्याने शहरात पाणी साचू नये म्हणून सिडकोने उघाडी पद्धतीचे धारण तलाव बांधलेले आहेत. पण या तलावांनी मातीचा गाळ जास्त धारण केल्याने या तलावातील पाणी बाहेर फेकले जात आहे. त्यामुळे शहरात आजूबाजूच्या भागात साचण्याच्या घटना घडत आहेत. हे वारंवा रिदसून येत आहे. मात्र या तलावांत खारफुटी वाढल्याने ते स्वच्छ करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. ती न मिळाल्याने या वर्षही यातील गाळ निघालेला नाही. मात्र महापालका प्रशासनाने पावसाळ्यात पाणी साचणार नाही असे आश्च्वासन दिले होते.

प्रशासन सतर्क
पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आणि इलटणपाडा जवळील डोंगरातील एक दरड कोसळल्याने नवी मुंबई पालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांना अर्लट राहण्याचे आदेश दिले आहेत. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुढील ४८ तासात साहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या विभागात पूर्णवेळ उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.