पनवेलमध्ये महिला प्रवाशांनाही सवलतीत ‘एनएमएमटी’ पास

गेली अनेक वर्षे प्रलंबीत असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाला अनुदान देण्याच्या निर्णयावर गुरुवारी अखेर शिक्कामोर्तब झाले.

पनवेल पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनुदानाला मंजुरी; अपंगाना मोफत तर ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनाही सवलत मिळणार

पनवेल : गेली अनेक वर्षे प्रलंबीत असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाला अनुदान देण्याच्या निर्णयावर गुरुवारी अखेर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पनवेलमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे अपंगांना मोफत प्रवास करता येणार असून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना सवलतीत पास घेता येणार आहे. विशेष म्हणजे एनएमएमटीबसमधून नवी मुंबईतही महिलांना सवलत दिली जात नाही. मात्र पनवेल पालिकेने या सवलतीत महिलांचाही समावेश केल्याने महिला प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

पनवेल पालिकेची स्वत: ची परिवहन व्यवस्था नसल्याने पनवेलमध्ये नवी मुंबई परिवहनच्या बस सेवा देतात. सुरुवातील एनएमएमटी प्रवासात नवी मुंबईतील सवलती प्रशासन पनवेलमध्ये देत होते. मात्र एनएमएमटीचा तोटा वाल्यानंतर त्यांनी पनवेल महापालिकेकडे अनुदानाची मागणी केली होती. मात्र हे अनुदान देण्यास पनवेल पालिका तयार नसल्याने ही सवलत नवी मुंबई परिवहन प्रशासनाने बंद केली होती. ती सवलत मिळावी यासाठी पनवेलमधून वारंवार मागणी होत होती. हा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबीत होता.

गुरुवारी पनवेल पालिकेच्या ४१ व्या सर्वसाधारण सभेत एनएमएमटी प्रशासनाला अनुदान देण्याबाबतचा ठरावावर मांडण्यात आला. याला भाजप व शेकाप महाविकास आघाडीच्या दोनही बाकांवरील पालिका सदस्यांनी बहुमताने मंजूरी दिली. पनवेल पालिका नवी मुंबई परिवहन उपक्रमाला सुमारे ६० लाख रुपये अनुदानापोटी खर्चाची तरतूद पालिका करणार असल्याचे पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी यावेळी जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटणार आहे. यामुळे पनवेलमधील सुमारे ३५ ते ४० हजार बसप्रवाशांना मोठा दिलासा महापालिकेने दिला आहे.

सध्या एनएमएमटी बससेवेत अपंगांना मोफत तर विद्यार्थ्यांनी सवलतीचा पास काढल्यावर त्यांना ५० टक्के तर जेष्ठ नागरिक महिला व पुरुषांसाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. मात्र नवी मुंबईत महिला प्रवाशांना अद्याप  सवलतीत तिकीट दिले जात नाही. पनवेल पालिकेने गुरुवारी मंजूर केलेल्या ठरावात तेथील महिला प्रवाशांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांनाही ५० टक्के सवलतीचा तिकीटदरात प्रवास करता येणार आहे. गुरुवारच्या निर्णयानुसार पनवेल पालिका ही महिलांना तिकीट दरात सवलत देणारी पालिका ठरणार आहे.

 पनवेल पालिकेचे शेकापचे सदस्य बबन मुकादम यांनी ही सवलत मिळविण्यासाठी पालिका कोणती प्रणाली राबविणार याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर स्पष्टीकरण देताना महापालिका आयुक्तांनी पनवेल पालिका संबंधित लाभार्थ्यांना ओळखपत्र दिल्यानंतरच ही सवलत घेता येईल असे नियोजन पालिका करणार असल्याचे जाहीर केले.  नवी मुंबई परिवहन यावर काय निर्णय घेते तेही महत्वाचे आहे.

पनवेलमध्ये ७० बसची सेवा

सध्या पनवेल पालिका क्षेत्रात ७० हून अधिक एनएमएमटीच्या बस सेवा देतात. यामध्ये बेलापूर-खोपोली मार्गिकेवर ७ बस , बेलापूर-कर्जत मार्गिकेवर ८ बस, मानसरोवर रेल्वेस्थानक ते कळंबोली ३ बस, खारघर स्थानक ते खारघर वसाहत ९ बस, पनवेल-ठाणे मार्गिकेवर १६ बस, पनवेल-दादर ७ बस, पनवेल-कोपरखैरणे ९ बस, पनवेल-करंजाडे ३ बस, पनवेल-साईनगर १ बस, पनवेल-कल्याण ७ बस, घणसोली ते तळोजा १० बस, बेलापूर ते तळोजा ३ बस धावत असल्याची नोंद एनएमएमटी प्रशासनाकडे आहे. करोना काळात बंद असलेले नेरे ते पनवेल आणि खांदेश्वर रेल्वेस्थानक ते खांदेश्वर ही बस सूरू  होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Discounted nmmt female passengers panvel ysh

Next Story
मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
ताज्या बातम्या