सिडकोच्या शिल्लक घरांच्या सोडतीलाही कमी प्रतिसाद

नवी मुंबई :  सिडकोच्या वतीने तळोजा नोडमधील ५७३० घरांची विक्री जाहीर करण्यात आली असून २६ जानेवारीपासून या घरांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  मात्र सिडकोच्या या घरांसाठी नागिरकांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. तळोजा नोडमधील पायाभूत सुविधांचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याची समस्या या दोन तक्रारींमुळे नागरिक तळोजामधील घरांना पसंती देत नसल्याचे दिसून आले आहे. या भागात ७५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना दहा ते पंधरा दशलक्ष लिटर पाण्याची कमकरता आहे. त्यामुळे या भागात टँकर लॉबी सक्रिय असून त्यांची पिण्याच्या पाण्याचे टँकर अमुक दरानेच विकत घेतले पाहिजेत अशी मक्तेदारी आहे. जुन्या मुंबई पुणे मार्गावरील पूर्व बाजूस सिडकोने तळोजा नोड विकसित केला आहे. नवी मुंबई मेट्रोचे एक टोक या तळोजा नोडमधील पेंदार येथे आहे. त्यामुळे मेट्रो कारशेड या ठिकाणी विकसित केली गेली असून खासगी विकासकांनी मोठय़ा प्रमाणात परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे.

याच भागात सिडकोने नुकतीच ५७३० घरांची सोडत काढली असून यातील १५२४ घरे ही पंतप्रधान आवास योजनेतील आर्थिकदृ्ष्टया दुर्बळ घटकासाठी राखीव आहेत. तर ४२०३ घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. सिडकोने यापूर्वीदेखील या क्षेत्रात तीन हजारांपेक्षा जास्त घरांची सोडत काढलेली आहे मात्र त्याला कमी प्रतिसाद आल्याने ही घरे पुन्हा विक्रीसाठी काढण्यात आलेली आहेत. नवी मुंबईच्या एका बाजूस असेलल्या या नोडमध्ये रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधांचा अभाव असून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. खासगी संकुलातील नागिरकांना लाखो रुपये टँकरच्या पाण्यासाठी भरावे लागत आहेत. त्यामुळे घर घेण्यास इच्छुक असलेले ग्राहक या समस्येमुळे तळोजामधील घरांकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिडकोने जाहीर केलेल्या २६ जानेवारीच्या सोडतीसाठी ग्राहकांचा कमी प्रतिसाद लाभत आहे.