मुंबई : अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानच्या ‘मेट्रो ७ अ’ प्रकल्पामुळे विर्लेपार्ले येथील वाल्मिकी नगरमधील ८९ कुटुंब विस्थापित होणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या रहिवाशांना गुरुवारी २४ तासांमध्ये घर रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. रहिवाशांनी मात्र यास विरोध केला आहे. विद्याविहार येथे स्थलांतरित होण्यास नकार देत जवळपास अथवा पश्चिम उपनगरातच घर देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. एमएमआरडीए मात्र निष्कासनाच्या कारवाईवर ठाम आहे. त्यामुळे यावरून नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
विर्लेपार्ले येथील वाल्मिकी नगरमधील ८९ कुटुंबांना ‘मेट्रो ७ अ’मुळे विस्थापित करावे लागणार आहे. या रहिवाशांना एमएमआरडीएच्या विद्याविहार येथील पुनर्वसन वसाहतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या रहिवाशांनी विद्याविहार येथे स्थलांतरित होण्यास नकार दिला आहे. ही घरे जुनी असून त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रहिवाशांनी या घरांना विरोध केला आहे.
रहिवाशांच्या या विरोधामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर या रहिवाशांना स्थलांतरित करणे आता गरजेचे आहे. त्यामुळे या रहिवाशांना आता निष्कासित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी २४ तासात घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीनंतर रहिवासी आक्रमक झाले आहेत. त्यांनी घरे रिकामी करण्यास विरोध केला आहे. मात्र एमएमआरडीएकडून कोणत्याही क्षणी कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.
कारवाईबाबत एमएमआरडीए ठाम
एमएमआरडीएच्या या कारवाईला ‘आप’च्या प्रीती शर्मा मेमन यांनीही विरोध केला आहे. एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त राहुल कर्डीले यांची भेट घेऊन पश्चिम उपनगरात जवळपासच या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. तसेच निष्कासनाच्या कारवाईला स्थगिती देण्याचीही मागणी केली आहे. त्यांचा यासंबंधीचा विनंती अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून महानगर आयुक्तांशी चर्चा करुन ते यावर अंतिम निर्णय घेतील अशी माहिती कर्डीले यांनी दिली. निष्कासनाची कारवाई करण्यासाठी पोलीस बळ न मिळाल्याने शुक्रवारी कारवाई होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पण कारवाईच्या भूमिकेवर एमएमआरडीए ठाम आहे. दुसरीकडे रहिवासी आणि मेमन यांनी घरे रिकामी करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावरुन वाद चिघळण्याची शक्यता आहे.