भाजप राज्यपाल व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार 

नवी मुंबई :  मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत लोकसंख्या आणि भौगोलिक सीमा तयार करताना असंतुलित तंत्राचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याची तक्रार भाजपच्या वतीने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही दाद मागितली जाणार आहे. भाजपचे नेते व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी प्रारूप तयार केल्यानंतरच आक्षेप घेत न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार असे जाहीर केले होते. त्यानंतर मंगळवारी प्रारूप समोर आल्यानंतरही त्यांनी याचा पुनरुच्चार केला आहे. 

नवी मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या रचनेत अनेक त्रुटी असल्याचा आरोप भाजप, मनसे आणि आरपीआय (आठवले) या विरोधी पक्षांनी केला आहे. अकरा लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील (ही लोकसंख्या २०११च्या जनगणेवर आधारित असून सध्या शहराची लोकसंख्या पंधरा लाखांच्या वर आहे) आगामी निवडणूक ही १२२ प्रभागांच्या ४१ बहुसदस्यीय प्रभागातून होणार आहे. अकरा लाख लोकसंख्येची विभागणी १२२ प्रभागांत केल्यास ही लोकसंख्या २५ ते २६ हजार प्रति प्रभाग अपेक्षित आहे. मात्र ही लोकसंख्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात ३१ ते ३२ हजार लोकसंख्येची करण्यात आली आहे. हा विरोधाभास असल्याचा आरोप नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. लोकसंख्येबाबत करण्यात आलेली हा असंतुलितपणा प्रभाग रचनांची सीमांकन ठरविण्यात करण्यात आला आहे. रबाळे येथील एका प्रभागाची सीमा आठ किलोमीटर लांब पावणे गावात जोडण्यात आली आहे. हा भाग एमआयडीसी क्षेत्रातील आहे. बहुसदस्यीय पद्धतीमुळे तीन नगरसेवकांचा एक प्रभाग झाला असून विकासकामांची वाटणी त्याप्रमाणे होणार आहे. त्यामुळे रबाळे येथील नागरिकांना नागरी तक्रार किंवा दाखला मिळविण्यासाठी दोन प्रभाग कार्यालयांवर अवंलबून राहावे लागणार असून पायताणे झिझवावी लागतील असा आरोप माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कालावधीत तक्रारी दाखल करतानाच नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात या असंतुलित प्रभाग रचनेच्या विरोधात दाद मागणार असून न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा ठेवली आहे. विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगावर विश्वाास व्यक्त करताना पालिकेतील अधिकाऱ्यांनी ही प्रभाग रचना करताना गल्लत केल्याचा आरोप त्यांनी केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची अपेक्षा केली आहे. प्रभाग रचनेत झालेल्या घोळाची तक्रार राज्य सरकारकडे करून उपयोग होणार नसल्याने ही बाब राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नियंत्रण नाही असे स्पष्ट करून राज्य निवडणूक आयोगाला निर्देश देण्याचे अधिकार असल्याने या घोळाची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे. सुधारणा न केल्यास आंदोलन केले जाईल असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेलाही फटका

असंतुलित प्रभाग रचनांचा फटका केवळ भाजपच्या संभाव्य उमेदवारांना बसला आहे असे नाही. हा फटका शिवसेनेच्या काही इच्छुक उमेदवारांनादेखील बसला आहे. नेरुळ सीवूड्समधील शिवसेनेचे विभाग प्रमुख असिफ बागबान यांचाही प्रभाग थेट अनिवासी संकुलाला जोडण्यात आला आहे. दक्षिण नवी मुंबईचे शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे आपला मुलगा अवधूत मोरे  याला पहिल्यांदाच राजकारणात उतरविणार होते पण त्यांचा प्रभाग वाशी सेक्टर एक व सहा असा तयार करण्यात आला आहे.