नवी मुंबई : दिवाळीच्या फराळासाठी आणि भेटवस्तूंसाठी सुकामेव्याची खरेदी वाढत असतानाच वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) घाऊक बाजारात सुकामेव्याचे दर वाढले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत विविध प्रकारच्या सुकामेव्याचे दर किलोमागे २०० ते ६०० रुपयांनी वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. यामुळे फराळ, मिठाई आणि सुकामेव्याच्या भेटवस्तूंसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
दिवाळीत घरगुती फराळ, मिठाई आणि लाडूंमध्ये सुकामेव्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर कार्यालये, व्यावसायिक आस्थापना आणि वैयक्तिक स्तरावर भेट देण्यासाठी सुकामेव्याच्या आकर्षक पेट्यांचीही मागणी असते. घाऊक बाजारातील दरवाढीचा परिणाम किरकोळ विक्रीवर झाल्यास यंदा सणाच्या खरेदीचे बजेट वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांत दिवाळीत नातेवाईक, मित्रमंडळी, व्यावसायिक भागीदार आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुकामेव्याच्या आकर्षक पेट्या भेट देण्याचे प्रमाण वाढले आहे. बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड यांसोबत वाळवलेल्या फळांचा समावेश असलेल्या या पेट्यांना विशेष मागणी असते. मात्र, यंदा सुकामेव्याच्या दरांत झालेल्या वाढीमुळे भेटवस्तूंच्या खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पेटीतील सुकामेव्याचे प्रकार, त्यांचा दर्जा आणि वजन यानुसार किमती ठरत असल्याने महागड्या प्रकारांचा समावेश असलेल्या पेट्यांच्या किमती वाढू शकतात.

सुकामेव्याबरोबरच वाळवलेल्या फळांचे दरही ग्राहकांच्या खर्चात भर घालणारे आहेत. मुंबई एपीएमसीच्या घाऊक बाजारात ब्लूबेरी प्रतिकिलो १,४०० ते १,६०० रुपये, क्रॅनबेरी ६०० ते ८०० रुपये, वाळवलेला आंबा ७६० रुपये, संत्रे १,००० रुपये, चेरी ८०० रुपये आणि कीवी ५६० रुपये दराने उपलब्ध आहे. काळे प्लम, पोमेलो, अननस, लिंबू आणि पपई यांचे दर प्रतिकिलो ६०० रुपये आहेत. आले ७०० रुपये, तर ब्लॅक करंट ८०० रुपये किलो दराने विकले जात आहे. या फळांचा समावेश असलेल्या प्रीमियम बॉक्ससाठीही ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

एपीएमसीतील दर (प्रतिकिलो)

पिस्ता (खारा) १,९०० ते २,१०० रुपये

हिरवा पिस्ता ३,००० ते ३,२०० रुपये

बदाम १,१०० ते १,५०० रुपये

काजू ९५० ते १,५०० रुपये

ममरा बदाम २,६०० ते ५,४०० रुपये

अंजिर १,००० ते २,४०० रुपये

अक्रोड ९०० ते २,२०० रुपये

पाइन नट्स ५,६०० ते ६,००० रुपये

चारोळी २,४०० ते २,८०० रुपये

मखाना १,४०० ते १,६००

ब्राझील नट्स ३,००० रुपये

सुकामेव्याच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील तुटवडा, आयात शुल्क आणि वाहतूक खर्च ही प्रमुख कारणे आहेत. इराण आणि अमेरिकेतून येणाऱ्या सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, बंदरातून मालाची आवकही अपेक्षेप्रमाणे होत नाही. – अमृत ढवळे, घाऊक व्यापारी