दिवाळीच्या फराळासाठी अधिकची पदरमोड ; इंधन दरवाढ, करोना टाळेबंदीमुळे विविध जिन्नस महाग

यंदाही सुक्या मेव्याला मोठय़ा कंपन्याकडून फारशी मागणी नाही, मात्र किरकोळ ग्राहकांचा सुका मेवा खरेदीकडील कल वाढला आहे.

पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई : करोनाचे संकट कमी झाल्यामुळे दिवाळीचा उत्साह उधाणला असला तरी, उसळत्या महागाईने मात्र खरेदीवर मर्यादा आली आहे. दिवाळीनिमित्त केल्या जाणाऱ्या फराळाच्या अर्थनियोजनाला महागाईचा फटका बसला आहे. खाद्यतेलाचे चढे दर आणि विविध जिन्नसांच्या किमतीत झालेली वाढ यांमुळे दिवाळीच्या फराळासाठी अधिक पदरमोड करावी लागत आहे. 

 दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्वच जिन्नसांच्या दरांत गतवर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याचे वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) घाऊक दरांवरून दिसून येते.

‘एपीएमसी’मधील घाऊक दरांमध्ये २० ते २५ टक्के वाढ झाल्याने किरकोळ दरांत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जवळपास ४०-५० टक्क्य़ांपर्यंत वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरांत सर्वाधिक दरवाढ झाली आहे. ती २०१९च्या तुलनेत ५० टक्के अधिक आहे. आधी ७०-१०० रुपये लिटर असलेले तेल आता १३०-१७० रुपयांवर पोचले आहे. तांदूळ, बेसन प्रतिकिलो १० रुपयांनी महाग झाले आहे. रव्याचे दरही किलोमागे ६ ते ८ रुपयांनी वाढले आहेत.

मैद्याच्या दरांतही किलोमागे ६ रुपयांची वाढ होऊन घाऊक बाजारात तो ३०-३२ रुपये किलो दराने विकला जात आहे. तुपाच्या दरांत प्रतिक्रिलो ६० तर डालडय़ाच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. चणाडाळीच्या भावात १० रुपयांनी वाढ झाली आहे.

दिवाळीमध्ये साखरेची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढते. साखरेवर नियमन नसल्यामुळे बाजार समितीच्या बाहेर परस्पर मोठय़ा प्रमाणात साखरेची विक्री होत आहे. साखरेच्या दरात किलोमागे चार रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सुक्या खोबऱ्याचे दरही २०१९च्या १६० रुपये प्रतिकिलोवरून ३०० रुपयांवर पोहोचले आहेत. 

 यंदाही सुक्या मेव्याला मोठय़ा कंपन्याकडून फारशी मागणी नाही, मात्र किरकोळ ग्राहकांचा सुका मेवा खरेदीकडील कल वाढला आहे.

आक्रोड, चारोळी, अंजीर महाग 

* सुक्या मेव्यातील आक्रोड आणि चारोळीच्या प्रतिकिलो दरात १०० रुपयांची वाढ

* अंजीरमध्ये ३००रुपयांनी वाढ, बदाम, काजू, किसमिस, पिस्ता यांचे दर मात्र स्थिर

* वेलचीच्या भावात २०१९ च्या तुलनेत ३०० ते ९००रुपयांची घसरण

मसाला बाजारातील व्यवहार व्यवस्थित सुरू आहेत. करोनापूर्व काळाच्या तुलनेत यंदाही सुक्या मेव्याचे बाजारभाव स्थिर असून बाजारात मागणी आणि पुरवठाही व्यवस्थित आहे. करोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुक्या मेव्याला अधिक मागणी होती, त्यामुळे त्याच्या दरांवर परिणाम झाला नाही. – विजय भुता, संचालक, मसाला बाजार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali faral cost increase due to fuel price hike zws

Next Story
सिडकोकडून भूमिपुत्रांवर अन्याय