scorecardresearch

कामोठेमध्ये तिहेरी आत्महत्या

डॉक्टर महिलेचा मुलीसह गळफास

कामोठेमध्ये तिहेरी आत्महत्या
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

डॉक्टर महिलेचा मुलीसह गळफास; प्रियकरानेही मृत्यूला कवटाळले

आर्थिक अडचणींसह इतर वैयक्तिक कारणांमुळे डॉक्टर महिलेने मुलीसह आत्महत्या केल्यानंतर महिलेच्या प्रियकरानेही गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना कामोठेमध्ये घडली. घरकाम करणाऱ्या महिलेने रविवारी घरात प्रवेश केल्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

जास्मीन पटेल, मुलगी ओसियान (१६) आणि इंदर अशी या तिघांची नावे आहेत. जास्मीन आणि इंदर हे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होते. कामोठे येथील इंद्रविहार संकुलात ते राहत होते. जास्मीन या तीन वर्षांपासून कामोठे येथे दवाखाना चालवत होत्या. गेल्या बुधवारी जास्मीन आणि ओसियान यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

‘माझ्या वेदना आणि आर्थिक अडचणींमुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्यानंतर मुलीचे हाल होऊ नयेत म्हणून तिलाही आत्महत्येची कल्पना दिली आहे. मला आयुष्यात साथ देणाऱ्यालाही माझ्या आत्महत्येस जबाबदार धरू नये’ असे जास्मीनने चिठ्ठीत लिहून ठेवले होते. जास्मीनने चिठ्ठी लिहिण्यासाठी श्री साईकृपा दवाखान्याचे लेटरहेड वापरले आहे. या चिठ्ठीवर तिने मुलगी ओसियानचीही स्वाक्षरी घेतली. विशेष म्हणजे आपला व मुलीचा देह केईएम रुग्णालयाला दान करावा, असेही तिने चिठ्ठीत नमूद केले होते.

शनिवारी रात्री इंदर हा घरी आल्यानंतर मायलेकींचे मृतदेह शयनगृहात लटकलेल्या अवस्थेत पाहून तो हादरला. ‘ज्यांच्यासाठी मी जगलो, त्यांनीच जगाचा निरोप घेतल्याने मीही आत्महत्या करीत आहे’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून इंदरनेही गळफास घेतला. रविवारी सकाळी घरकाम करणाऱ्या रिना खानने दरवाजा उघडताच हा प्रकार उघडकीस आला.

आर्थिक अडचणीमुळे जास्मीन यांनी रिना खान यांचा दोन महिन्यांचा पगार आणि घरभाडेही दिले नव्हते, असे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी घरात तीन खोके ठेवले होते. त्यातील एकावर मैत्रीण अरुणा रॉय यांचे नाव होते. त्यात घरातील साहित्य, शोभेच्या वस्तू ठेवल्या होत्या. दुसऱ्या खोक्यावर ‘चेअरमन’ असे लिहिले होते, तर तिसऱ्या खोक्यात त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी काही साहित्य व कागदपत्रे होती, असे पोलिसांनी सांगितले.

जास्मीन कर्जबाजारी

डॉ. जास्मीन पटेल यांच्यावर बिलासपूर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी यापूर्वी तिला कामोठे येथे अटक झाली होती. त्यांनी विविध बँकांचे कर्ज घेतले असून, कर्जफेडीस त्या असमर्थ ठरल्या होत्या. इंदरचा व जास्मिनचा प्रेमविवाह झाल्याचे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. मात्र, जास्मीन आणि इंदर हे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होते, अशी चर्चा आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-04-2017 at 01:56 IST

संबंधित बातम्या