scorecardresearch

रसायनाने नव्हे, रंगामुळे कुत्रा निळा

रसायनमिश्रित पाणी पिण्यामुळे या कुत्र्याचा रंग निळा झाल्याचे वृत्त गेल्या आठवडय़ात पसरवण्यात आले होते

रसायनाने नव्हे, रंगामुळे कुत्रा निळा
रसायनमिश्रित पाणी पिण्यामुळे या कुत्र्याचा रंग निळा झाल्याचे वृत्त गेल्या आठवडय़ात पसरवण्यात आले होते

शरीरात रसायनांचे अंश नसल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट

तळोजा औद्योगिक वसाहतीतील कुत्रा हा प्रदूषणामुळे नव्हे, तर रंग लागल्यामुळे निळा झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्याच्या पोटात किंवा रक्तात कुठेही रसायनांचे अंश आढळलेले नाहीत, असे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. रसायनमिश्रित पाणी पिण्यामुळे या कुत्र्याचा रंग निळा झाल्याचे वृत्त गेल्या आठवडय़ात पसरवण्यात आले होते. त्यानंतर प्राणीमित्र आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष तळोजा औद्योगिक वसाहतीकडे वेधले गेले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते, तर एका कंपनीला टाळे ठोकण्यात आले होते.

या निळ्या श्वानाला ‘ठाणे सोसायटी फॉर द प्रिव्हेशन ऑफ क्रुअल्टी टू अ‍ॅनिमल्स’ (एसपीसीए) या संस्थेने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवले होते. त्याच्या रक्ताची, त्वचेचा तपासणी केली. केसांवर व त्वचेवर लागलेल्या रंगामुळे हा कुत्रा निळा झाल्याचे आणि त्याला धुतल्यानंतर त्याचा रंग पांढरा झाल्याचे एसपीसीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ‘लोकसत्ता’ने ठाणे येथील अ‍ॅनिमल हॉस्पिटल अ‍ॅण्ड इमर्जन्सी सेंटरशी संपर्क साधल्यावर ही माहिती मिळाली. भटक्या श्वानांचे रंग रसायनांच्या संपर्कामुळे बदलत असल्याची चर्चा होती भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या नवी मुंबई ‘अ‍ॅनिमल प्रोटेक्शन सेल’ या सामाजिक संस्थेच्या आरती चौहान यांनी ही स्थिती प्राणीमित्रांसमोर जाहीर केली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील (एमपीसीबी) साहाय्यक प्रादेशिक अधिकारी हजारे यांनी ‘डुकॉल कंपनी’च्या परिसरात हा कुत्रा भटकत असल्यामुळे तो कंपनीत जाऊन त्याला निळा रंग लागला असावा, अशी शक्यता वर्तविली होती. एमपीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डुकॉल कंपनीला दोषी मानत ठपका कायम ठेवला. एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी अनिल मोहेकर यांनी संबंधित कंपनीला बंद ठेवण्याची नोटीस बजावली. ज्या प्रवेशद्वारातून कुत्रे कंपनीत शिरतात ते बंद ठेवण्यात यावे, कंपनीमधून निळ्या रंगाचे थेंब उडू नयेत यासाठी डस्ट कलेक्टर लावावे, कामगारांनी आंघोळ केल्यावर व हातपाय धुतल्यावर कंपनीतून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामायिक प्रक्रिया केंद्र उभारावे, अशा सूचना करण्यात आल्या होत्या.

डय़ुकॉल ही कंपनी डिर्टजटसाठी लागणारा कच्चा माल तयार करते. त्यासाठी ‘अल्फा ब्लू’ या रसायनाचा वापर केला जातो. ‘अल्फा ब्लूत्’मुळे मानवी शरीरावर आणि पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला होता.

रंग, रसायने व रंगाचे उत्पादने घेणारे अनेक कारखाने या परिसरात आहेत. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी डय़ुकॉल कंपनीला कोणत्या आधारे लक्ष्य केले याचा खुलासा अद्याप झालेला नाही. प्रत्यक्षात अद्याप कोणीही संबंधित श्वानाला डय़ुकॉल कंपनीच्या आतील परिसरात वावरताना पाहिलेले नाही.

एका श्वानाचे डोळे निकामी

* एसपीसीए संस्थेने निळ्या श्वानाला पुन्हा तळोजा औद्योगिक वसाहतीत सोडल्यावर याच परिसरात एका भटक्या श्वानाला डोळ्यांचा विकार असल्याची तक्रार संस्थेच्या प्रतिनिधींकडे आली. त्याची तपासणी केली असता, दोन्ही डोळे निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. ‘नायट्रिक अ‍ॅसिड’ डोळ्यांत गेल्यामुळे अंधत्व आल्याची माहिती संस्थेने दिली.

* एसपीसीए संस्थेत दाखल होणाऱ्या श्वानाला उपचारादरम्यान नाव देण्यात येते. निळ्या श्वानाचे नामकरण ‘तळोजा’ तर डोळे निकामी झालेल्या श्वानाचे नाव ‘नायट्रिक’ ठेवण्यात आले होते. ‘नायट्रिक’ पुढील दोन महिने ठाणे येथील एसपीसीएच्या रुग्णालयात उपचार घेणार आहे.

* डॉ. विक्रम दवे आणि डॉ. संजय जाधव यांनी दोन्ही श्वानांवर उपचार केले आहेत. एमपीसीबीने आता नायट्रिक अ‍ॅसिडचा वापर करणाऱ्या कारखान्यांवरही एमपीसीबी कारवाई करणार का, असा प्रश्न आहे.

तळोजा येथील निळ्या रंगाच्या श्वानाला काहीही त्रास झालेला नाही. तो सुरक्षित आहे. त्याचे डोळे लालसर होते, तसेच त्याला शौचास कडक होत होते. त्याच्या पोटात रसायने असल्याचा संशय आम्हाला सुरुवातीला होता. मात्र रक्तपेशी व त्वचेच्या तपासणी अहवालात, असे काहीच आढळले नाही. त्याच्या त्वचेवर निळा रंग लागल्यामुळे तो निळा दिसत होता. रुग्णालयात नेल्यावर त्याला स्वच्छ धुतले. रसायनयुक्त पाणी पिण्यामुळे त्याचे अंग निळे झाले नव्हते.

– डॉ. संजय जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी, ठाणे एसपीसीए

आमच्या कंपनीत कोणतेही रंग बनविले जात नाहीत. डय़ुकॉल ऑरगॅनिक ही कंपनी कार्बन आधारित रंगद्रव्य व विस्तारकांचे उत्पादन करते. या उत्पादनांचा मानवी शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. आमची उत्पादने कापड उद्योग, रंग, साबण आणि डिर्टजटसाठी विकली जातात. ही उत्पादने सर्वसामान्य ठिकाणी वापरली जाणारी व पाण्यात न विरघळणारी आहेत. आमच्या युनिटमधून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी बाहेर जात नाही. पूर्णपणे कोरडी उत्पादन प्रक्रिया आहे.

-व्यवस्थापक, डय़ुकॉल ऑरगॅनिक कंपनी

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-08-2017 at 03:24 IST

संबंधित बातम्या