नवी मुंबई : डीपीएस तलाव परिसरात फ्लेमिंगोंबरोबरच सोनेरी कोल्हे, मुंगूस आणि विविध वन्यपशु-पक्ष्यांचा वावर आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर येथील नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्याची मागणी नागरिक करत आहेत. डीपीएस तलाव परिसराचे संवर्धन तसेच नेरुळ सेक्टर ५२-ए चा फ्लेमिंगो संवर्धन क्षेत्रामध्ये समावेश करण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना वन्यजीवांचा अधिवास अबाधित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका नेत्रा आशिष शिर्के यांनी डीपीएस तलाव परिसरातील फ्लेमिंगोंची घटती संख्या तसेच सेक्टर ५२-ए तील वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा उपस्थित करत वनमंत्री नाईक यांना निवेदन दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने नाईक यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस नगरसेविका नेत्रा शिर्के, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे अधिकारी रविंद्र मानकर, नवी मुंबई पर्यावरण समूहाचे प्रतिनिधी तसेच वन आणि कांदळवन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबईची ओळख आणि वैभवामध्ये फ्लेमिंगोंचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांच्या संरक्षणाची गरज नाईक यांनी व्यक्त केली. नवी मुंबईची जडणघडण आणि नैसर्गिक वैभव टिकले पाहिजे यासाठी गेल्या ५६ वर्षांपासून आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी नवी मुंबईतील फ्लेमिंगो अधिवास असलेल्या परिसराच्या संवर्धनाबाबत भूमिका स्पष्ट केली असल्याचे नाईक यांनी नमूद केले.

एनआरआय कॉलनी परिसरात सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आढळत असल्यास तो परिसर त्या दृष्टीने संरक्षित ठेवण्याची सूचना नाईक यांनी केली. फ्लेमिंगोंसह सोनेरी कोल्हे, मुंगूस आणि अन्य वन्यजीवांकडे सिडको तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे डीपीएस तलाव परिसर आणि त्यालगतच्या भागातील जैवविविधतेचा प्रश्न केवळ फ्लेमिंगोंपुरता मर्यादित राहिलेला नसून अन्य वन्यजीवांच्या अधिवासाच्या संरक्षणाचाही मुद्दा बैठकीत केंद्रस्थानी राहिला.

डीपीएस तलाव परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन तेथील नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. फ्लेमिंगोंसाठी पोषक नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासाठी तलाव परिसरातील नैसर्गिक परिस्थिती जपण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तलावातील नैसर्गिक जलस्रोत आणि अन्नसाखळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सेक्टर ५२-ए चा संवर्धन क्षेत्रात समावेश करा

नेरुळ सेक्टर ५२-ए परिसरातील वन्यजीवांचे अस्तित्व कायम राहण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या परिसराचा फ्लेमिंगो संवर्धन क्षेत्रामध्ये समावेश करण्याबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या मुद्द्यावर विचार करण्यात आला. नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी या भागात वाढते वन्यजीवांचे अस्तित्व लक्षात घेता या परिसराचा समावेश संवर्धन क्षेत्रात करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

सात दिवसांत इतिवृत्त

बैठकीतील निर्देशांचे इतिवृत्त सात दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डीपीएस तलावाचे संवर्धन, फ्लेमिंगोंसाठी पोषक नैसर्गिक अधिवास निर्माण करणे, सेक्टर ५२-ए तील वन्यजीवांचे अस्तित्व कायम ठेवणे आणि या परिसराचा फ्लेमिंगो संवर्धन क्षेत्रामध्ये समावेश करण्याच्या प्रक्रियेबाबत संबंधित विभागांनी पुढील कार्यवाही करावी, अशी भूमिका बैठकीतून स्पष्ट झाली. फ्लेमिंगोंच्या अधिवासामुळे यापूर्वीच नवी मुंबईच्या पर्यावरणीय ओळखीचा महत्त्वाचा भाग ठरलेल्या डीपीएस तलाव परिसरात आता सोनेरी कोल्हे, मुंगूस आणि अन्य वन्यजीवांचाही वावर अधोरेखित झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील जैवविविधता जपण्यासाठी प्रशासनाकडून होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

वनविभागाच्या अहवालात काय?

वनविभागाच्या पाहणी अहवालानुसार डीपीएस तलाव परिसरातील ३६.८७८ हेक्टर क्षेत्र संवर्धन क्षेत्र म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. सेक्टर ५२-ए हे क्षेत्र सिडकोच्या ताब्यात असून, नकाशानुसार ते थेट कांदळवन क्षेत्रात नसले तरी त्यातील काही भाग कांदळवन बफर क्षेत्रात येत असल्याचे अहवालात नमूद आहे. या ठिकाणी विकासकामांसाठी लोखंडी पत्रे लावून जागा बंदिस्त केली जात असल्याच्या तक्रारीचाही बैठकीत विचार करण्यात आला. विकासकामांच्या नावाखाली नैसर्गिक अधिवासाची हानी होणार नाही, यासाठी सिडको, महापालिका आणि वन विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विभागांनी कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले.