नवी मुंबई : राज्यातील एक श्रीमंत महामंडळ सिडकोच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही तेवढेच घसघशीत असल्याने राज्यात तो चर्चेचा विषय आहे. मात्र याच कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याची काही उदाहरणे असून रायगड जिल्ह्यातील पाबळ खोऱ्यात पाण्यासाठी दरवर्षी :दाहीदिशा फिरविशी जगदिशा: म्हणणाऱ्या शेकडो आदिवासी बांधवांना यंदापासून कूपनलिकांद्वारे पिण्याचे पाणी मिळणार आहे. सिडकोतील ओबीसी कर्मचारी संघटनेने हा उपक्रम हाती घेतला असून त्यासाठी चार लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पाणी या विषयावर काम करणाऱ्या पाणी फाऊंडेशनला देखील गेल्या वर्षी संघटनेने आर्थिक मदत केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती सकारात्मक कार्याने साजरी करण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक आदिवासी दऱ्याखोऱ्यांत आणि दुर्गम भागात राहतात. रानमेवा, रानभाज्या बाजारात विकून हा समाज आपला उदरनिर्वाह करीत आहे. आदिवासी बांधवांसाठी अनेक सामाजिक संघटना काम करीत असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर व दक्षिण रायगड भागातील काही गावांना आजही पाणी, वीज, रस्ते या पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. अनेक आदिवासी पाडय़ांना अधिकृत वीज जोडणी दिली जात नसल्याने ते नाईलाजास्तव वीज चोरी करीत असल्याचे दिसून येते. पावसाळा आणि त्यानंतरचे काही महिने आदिवासी पाडय़ांतील नदी, नाले, झरे, तलाव, विहिरी या नैर्सगिक स्रोतांवर पाण्याची गरज भागविणाऱ्या आदिवासींना मार्चनंतर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र आहे. पाण्यासाठी काही मैल पायपीट केल्यानंतर केवळ पिण्याचे पाणी घरी आणले जात आहे. शहरापासून वीस ते तीस किलोमीटर अंतरावरील आदिवासी पाडय़ात ही स्थिती असताना पेण तालुक्यातील पाबळ खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचे विदारक चित्र आहे. या आदिवासी बांधवांसाठी साकाव पेण प्रकल्प ही सामाजिक संस्था काम करीत असून या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपाययोजना आखत आहे. या संस्थेच्या अरुण शिवकर यांनी श्रीमंत महामंडळ असलेल्या कर्मचारी संघटनांकडे आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
गेली अनेक वर्षे सिडकोत डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची वैचारिक जयंती साजरी करणाऱ्या ओबीसी एम्प्लॉईज असोशिएशनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे व सचिव नितीन कांबळे यांनी पुढाकार घेतला आणि या संस्थेच्या माध्यमातून पाबळ खोऱ्यातील दुर्गम आदिवासी भागातील उसरवाडी, बरडावाडी, ताडमाळ या तीन गावांना कूपनलिका उभारून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी या कामगार संघटनेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने या सामाजिक कार्याला हातभार लावला. त्यामुळे पाबळ खोऱ्यातील तीन गावांत तीन कूपनलिका बांधल्या जात असून त्यासाठी चार लाखांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. यंदा पाऊस लवकर पडणार आहे. पाऊस लवकर पडला तरी नैसर्गिक स्रोत लगेच निर्माण होत नाहीत. त्यामुळे महिनाअखेर तयार होणाऱ्या या कूपनलिका येथील आदिवासींसाठी वरदान ठरणार असून पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या या गावात पाण्यासाठी चारशे फुटांपेक्षा जास्त खोदकाम करावे लागले.
स्वातंत्र्यानंतर ही दुर्गम भागात पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे दु:ख वाटत असल्याचे सचिव कांबळे यांनी सांगितले. असोसिएशनच्या या सामाजिक कार्यात कर्मचाऱ्यांच्या मुख्य कामगार संघटनेचे नेहमीच सहकार्य राहील, असे अध्यक्ष विनोद पाटील यांनी स्पष्ट केले.