महामुंबईत चार लाख घरांची निर्मिती प्रगतिपथावर?

नवी मुंबई : सिडकोने दोन लाख घरे बांधण्याचे लक्ष ठेवल्यानंतर खासगी विकासकांनीही नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात तेवढीच घरे बांधण्याचा नियोजन आखले आहे. विविध वित्त संस्थांनी गृहकर्ज स्वस्त केल्याने या भागात परवडणारी घरे घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मागणी वाढत असल्याने शासकीय व खासगी घर, दुकाने बांधली जात असल्याने महामुंबई क्षेत्रात दिवाळीनंतर बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकरांचे मत आहे.

शेअर मार्केट वधारू लागल्यानेही या क्षेत्रातील बांधकाम व्यवसाय वाढण्यामागील कारण असल्याची चर्चा आहे. मुंबईपेक्षा नवी मुंबईतील पाायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधा अधिक असल्याने महामुंंबईला राहण्यास पसंती दिली जात आहे.

करोना साथीमुळे गेली दीड वर्षे बांधकाम व्यावसायिकांसाठी कठीण गेलेली आहेत. महागाई वाढल्याने बांधकाम खर्चदेखील वाढला आहे. त्यामुळे काही बांधकाम व्यावसायिकांनी हा व्यवसाय सोडून इतर व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मागील काही दिवसांत शेअर मार्केटमधील गुंतवणूक व बँकांनी कमी केलेले गृहकर्ज या दोन कारणांमुळे मुंबईबाहेर घर घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. करोनामुळे दुसऱ्या घराचे स्वप्नदेखील अनेकांनी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.

सिडको सध्या २४ हजार घरांचा प्रत्यक्षात ताबा देण्यासाठी प्रक्रिया राबवत असून आणखी चार हजार घरे बांधण्याची तयारी करीत आहे. सिडकोच्या महागृहनिर्मितीमुळे पायाभूत सुविधा झपाटय़ाने तयार होत आहेत. याशिवाय विमानतळ, रेल्वे, मेट्रो, कॉर्पोरेट पार्क, गोल्फ, सी लिंक यासारख्या मोठय़ा प्रकल्पामुळे पश्चिम व मध्य रेल्वे मार्गापेक्षा हार्बर मार्गाकडे घर घेणाऱ्यांचा कल वाढला आहे. मागणी वाढत असल्याने बांधकाम वाढविण्याची तयारी बांधकाम व्यावसायिकांनी सुरू केली आहे. सहा महिन्यांनंतर या व्यवसायाला अधिक चालना येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) मोठय़ा प्रमाणात घरे तयार होणार आहेत. सध्या विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या पुष्पकनगर व उलवा येथे मोठय़ा प्रमाणात बांधकाम सुरू आहे.

खासगी विकासकांकडून परवडणारी घरे?

करोना साथ हे एक संकट असले तरी ती एक संधी ठरणार आहे. नैना क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात घरे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकार व सिडकोने या भागासाठी सर्वानी पूरक असे धोरण राबविण्याची गरज आहे. सिडको घर बांधत असल्याने खासगी विकासकांनी न थांबता अधिक परवडणारी घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. ही एक सकारात्मक स्पर्धा आहे. यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे. गृहकर्ज व शेअर मार्केटमधील तेजीमुळे महामुंबई क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात घरे, वाणिज्यिक संकुले तयार होणार असल्याचे बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे  विश्वस्त भूपेन शहा यांनी सांगितले.