उरण : द्रोणागिरी नोड हा उरणमधील सर्वात मोठा औद्योगिक परिसर आहे. येथील मार्गांवर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच अनेक ठिकणी रस्त्यांवरच ही वाहने उभी करण्यात येतात. यामुळे या परिसरात बेकायदा वाहनतळे निर्माण झाली असून अपघाताचा धोका वाढला आहे.
जेएनपीए परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, दळणवळण सुरळीत होण्यासाठी २०१८ ला जेएनपीए आणि राष्ट्रीय महामार्गाने सहापदरी रस्ते बनविले आहेत. त्याचबरोबर अपघात कमी होण्याच्या दृष्टीकोनातून छोट्या वाहनांसाठी सेवारस्ते बनविले आहेत.
मात्र या मार्गांवर छोटी वाहने न चालता रिकामे कंटेनर यार्ड गोदामांच्या अवजड वाहनांनी त्याचा ताबा घेतला आहे. सेवा मार्गांवर अनेक ठिकाणी अवजड वाहनांची बेकायदा वाहनतळे निर्माण झाली असून याचा फटका येथील वाहतुकीला बसत आहे. जेएनपीए बंदराची निर्मिती झाल्यावर या विभागात काही प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाल्याने भूमिपुत्रांना रोजगार मिळाला हे खरे असले तरी येथील गावांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. या गावांच्या परिसरात जेएनपीए बंदरातील माल साठविण्याची अनेक गोदामे सुरू झाली.
पर्यायाने या विभागात अवजड वाहनांची वर्दळ वाढली. प्रशासनाने येथे नवीन रस्ते बनवेले. मात्र त्याच रस्त्यांवर आता बेकायदा वाहनतळे निर्माण झाली आहेत. यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या उद्भवत आहे. तालुक्यातील द्रोणागिरी नोड, खोपटे कोप्रोली रस्ता, दिघोडे -गव्हाण फाटा येथे अनेक अवजड वाहने बेकायदा उभी करण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीतून वाट काढताना अनेक दुचाकीस्वार अवजड वाहनांना धडकत असल्याने अपघात होत आहेत.
खड्ड्यांचे विघ्न
द्रोणागिरी नोड भागातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. दीड ते दोन फुटांचे खोल खड्ड्यांमुळे अपघाताचा धाका वाढला आहे. त्यामुळे येथील रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी नागरीक करत आहेत.
द्रोणागिरी नोड परिसरातील अवजड वाहनांची समस्या दूर करण्यासाठी वाहनतळांची आवश्यकता आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. येत्या १० ऑगस्टला जेएनपीएकडून वाहनतळ देण्यात येणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोंडी दूर होईल. राहुल खाडे, उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई</strong>
