उरण : पावसाळ्यात खोल समुद्रातील व खाडीतील मासळीचे प्रमाण कमी होत असल्याने सुक्या मासळीचा वापर केला जातो. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून सुक्या मासळीला मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे. यामध्ये आंबार, बोंबील जवळा, कोलंबीचे सोडे याला अधिक पसंती दिली जात आहे. मात्र गेल्या काही महिन्यात मासळीची आवक घटल्याने सुक्या मासळीच्या दरात वाढ झाली आहे. याचा फटका खवय्यांना बसत आहे.
कोकणात किनारपट्टीवर रायगड जिल्ह्यातील गावांमध्ये आगरी – कोळी समाजाचे वास्तव्य आहे. पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्याने हे गावकरी सुक्या मासळीची मोठ्या प्रमाणात साठवण करीत असतात. या बेगमीची तयारी सुरू झाली असून यासाठी उरण तालुक्यातील करंजा, खोपटे, केळवणे, दिघाटी परिसरात अनेक ठिकाणी मासळी सुकवताना दिसून येत आहे.
यामध्ये बोंबील, वाकट्या समवेत गावाजवळील रस्त्यावर देखील लांबलचक पट्ट्यात जवळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती उरण येथील स्थानिक गावकरी समीर कडू यांनी दिली आहे. सध्या या रस्त्याच्या कडेला छोट्या टोपल्या मांडून सुकी मासळी विकण्यात येत आहे. यामध्ये, अनेक प्रकारच्या मासळीचा समावेश असून सुकी माखली, पापलेट, शिंगाली, बागडे, मांदेलीचा समावेश आहे.
तर जवळा, वाकट्या, कोलंबी सोडे, आंबार याला सर्वाधिक पसंती असल्याचे केळवणे येथील मासळी विक्रेती समीरा पाटील हिने सांगितले आहे. तसेच, सुके बोंबील, वाकट्या आणि कोलमाची वडी या भाजून खाण्याची चव अधिक असल्याचे मासळी विक्रेते घनश्याम पाटील यांनी सांगितले आहे.
जवळा सगळ्यांच्याच पसंतीचा
सुक्या मासळीतील कोलंबी सोडे हे सुमारे १८०० रुपये किलो दराने सर्वात महाग विकले जात आहेत. सर्वाधिक मागणी असलेला जवळा हा अवघ्या २०० रुपये दराने विकण्यात येत आहे. यामुळे, उरण तालुक्यातील अनेक खवय्ये हे सुक्या मासळीची साठवण करण्यासाठी गर्दी करताना होत आहे.
सुक्या मासळीची प्रती किलोचे दर – कोलमाची वडी – ५० रुपये (१२ नग)
जवळा – २०० रुपये
आंबार – ४०० रुपये
दांडी सुकट – ४०० रुपये
बोंबील – ४०० ते ७०० रुपये
वाकट्या – २०० ते ५०० रुपये
माखली – १००० रुपये
पापलेट – ६०० रुपये
कोलंबी सोडे – १८०० रुपये
