पावसाला सुरुवात झाल्यानंतर बाजारात सीताफळाचा हंगाम सुरू होतो. मात्र यावर्षी राज्यात तुरळक पाऊस होत असल्याने सीताफळाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम दिसत आहे. लहान आकारची फळे बाजारात येत असून आवकही कमी आहे.जूनअखेर, जुलै महिन्यात सुरुवातीला मुंबई कृषी उत्पन्न बाजारात सीताफळाची आवक होते. ऑगस्टमध्ये आवक वाढून सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत सीताफळाचा हंगाम असतो.

यावर्षी जून महिना संपत आला तरी चांगला पाऊस झालेला नाही. तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे सीताफळ पिकावर परिणाम होत आहे. बाजारात सध्या तुरळक २०० ते ३०० क्रेट सीताफळ आवक होत आहे. तसेच पुरेसा पाऊस नसल्याने सीताफळाची वाढ होत नसल्याने लहान आकारची फळे आहेत. पावसावरच सीताफळाची वाढ अवलंबून असते असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

सीताफळाचे पुणे व नगर जिल्ह्यातून आवक होत असते. सध्या बाजारात पुणे येथील सीताफळ आवक सुरू झाली आहे. सीताफळ परिपक्व होण्यासाठी चार ते साडेचार महिन्यांचा कलावधी लागतो. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिकाला पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. परिणामी पीक उत्पादन घेण्यास विलंब होतो. सध्या घाऊक बाजारात सीताफळ ३० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने सीताफळ उपलब्ध आहेत.