पनवेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पनवेल महानगरपालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहेत. वायू व ध्वनी प्रदूषणावर नियंत्रणाचे नियम न पाळणा-या ३४ प्रकल्पांचे बांधकामांना अखेर महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानंतर स्थगिती देण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत व्यापक तपासणी करून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने शनिवारी दिली. स्थळपाहणी अहवालानुसार ३४ बांधकामस्थळांवर कठोर कारवाई करण्यात आली असून सदर प्रकल्पांचे काम तात्काळ थांबविण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मागील महिन्यात महापालिकेच्या प्रभाग स्तरीय पर्यावरण समिती आणि नगररचना विभागाने महापालिका क्षेत्रातील १६९ बांधकाम प्रकल्पांना / स्थळांना उपाययोजना करणेबाबत अथवा काम बंद करणेबाबाबत इशारावजा जाहीर नोटीस दिली होती. संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्यानंतरही काही व्यवसायिकांनी अपेक्षित कार्यवाही न केल्याचे दिसून आले.
त्यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने पुन्हा एकदा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केल्यानंतर या तपासणीमध्ये अनेक ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न करणे, बांधकाम साहित्य खुले ठेवणे, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्या साहित्यावर नियमाप्रमाने पाणी न शिंपडणे, वाहन स्वच्छता न करणे, तसेच ब्लास्टिंग करतानाच्या मानक कार्यपद्धतीचे पालन न करणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आल्या.
त्यानंतर आयुक्त चितळे यांनी नियम न पाळणा-यांना बांधकाम व्यावसायिकांना पर्यावरणाचे महत्व समजण्यासाठी कळंबोली विभागातील १० बांधकाम प्रकल्प, कामोठे विभागातील ९ बांधकाम प्रकल्प आणि नवीन पनवेल तसेच पनवेल शहर विभागातील १५ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबविण्याची कारवाई केली.
या बांधकाम व्यावसायिकांना सुधारात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले असून नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ हवा व पर्यावरण संरक्षण याबाबत पनवेल महानगरपालिका कटिबद्ध असून, यापुढेही अशा प्रकारच्या तपासण्या व कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बांधकामांच्या स्थळपाहणीत काय आढळले
– विकासकांनी बांधकाम प्रकल्पांच्या भोवती किमान २५ फूट उंचीचे धातूचे पत्रे लावण्यात आल्याचे दिसून येत नाही.
– बांधकाम चालू असणाऱ्या सर्व इमारतींच्या भोवती ओल्या हिरव्या कापडाने / ओल्या तागाच्या कापडाने / ताडपत्रीने बंदिस्त करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
– बांधकामच्या ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर / स्मॉग गन द्वारे सतत फवारणी करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
– बांधकाम जागेवरील हवेमध्ये प्रदूषण करणाऱ्या भंगार / पाडकाम साहित्यावर पाणी शिंपडण्यात आल्याचे दिसून येत नाही.
– बांधकाम साहित्य तसेच रेडी मिक्स काँक्रीट वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे वरच्या बाजूने व सर्व बाजूनी पूर्ण झाकलेली असावीत. वाहनातून कोणत्याही प्रकारे गळती होऊ नये तसेच ओव्हरलोड होऊ नये, ह्याची दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही.
– बांधकामाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे दिसून येत नाही.
– बांधकामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू प्रदूषण मॉनिटर्स लावणे बंधनकारक असेल, प्रदूषणाची पातळी ओलांडणार नाही याबाबत उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
– बांधकामाच्या ठिकाणी ग्राइंडिंग, कटिंग, ड्रोलिंग, सोईग आणि ट्रिमिंग ची कामे बंदिस्त भागात करावी व हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचे स्प्रिंकलर वापरून सतत फॉगिंग करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
– बांधकामाच्या ठिकाणी असणारी माती, वाळू, बांधकाम साहित्य हे बंदिस्त भागामध्ये साठविण्यात आल्याचे दिसून येत नाही.

