संतोष जाधव
नवी मुंबई : पयार्वरणपूरक वाहतुकीच्या दिशेने नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा प्रवास सुरू असून रविवारी सुट्टीच्या दिवशी फक्त विद्युत व सीएनजी बसमधून प्रवासी वाहतुकीच्या प्रयोग यशस्वी होत असल्याने आता शनिवार, रविवार व सार्वजिनक सुट्टीच्या दिवशी ‘नो डिझेल बस’चा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे. जानेवारीपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून परिवहनची महिन्याला ६० ते ७० लाखांची बचत होत आहे.
प्रदूषणातील अत्यंत घातक घटक असलेल्या कार्बनचे प्रमाण कमी करण्याचा निर्धार नवी मुंबई पालिकेने केला असून त्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू आहेत. पालिका वापरत असलेली वाहने तसेच एनएमएमटीच्या ताफ्यातील सर्व वाहने ही विद्युत अथवा सीएनजी इंधनावरील करण्यात येत आहेत.
सध्या परिवहन उपक्रमात १८० विद्युत, १२० सीएनजी आणि २७२ डिझेलवर चालणाऱ्या बस आहेत. या सर्व बसमधून दररोज प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. मात्र डिझेल दरवाढीमुळे परिवहनचा तोटा वाढला आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमाने जानेवारीपासून एक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी फक्त विद्युत व सीएनजी बसमधूनच प्रवासी वाहतूक केली जात आहे. १५ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या नवीन उपक्रमामुळे इंधनापोटी ६० ते ७० लाखांची बचत होत आहे.
करोनापूर्वी डिझेलचे दर ६५ रुपये प्रतिलिटर होते. ते आता १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे एनएमएमटीच्या तोटय़ात वाढ झाली आहे. त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यात आता आगामी काळातही रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नो डिझेल बस हे लक्ष्य ठेवले आहे. तसेच लवकरच ५० डबल डेकर तर आणखी ५० पर्यावरणपूरक बस घेण्यात येणार आहेत. तसेच डिझेलवरील सर्व बस सीएनजीत रूपांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत पुढील काळात फक्त पर्यावरणपूरक बसमधूनच प्रवासी वाहतूक हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामुळे इंधनापोटी होणाऱ्या मोठय़ा खर्चात बचत होणार असून पालिकेने सुरू केलेल्या कार्बनमुक्त शहरासाठी याचा मोठा हातभार लागणार आहे.
तोटा दहा कोटींवर
नवी मुंबई परिवहन उपक्रमाची आर्थिक परिस्थिती बेताची असून दैनंदिन कामकाज आणि विविध प्रकल्प व देखभाल दुरुस्ती तसेच काही नावीन्यपूर्ण योजना राबविताना अडचणी येत आहेत. त्यातच इंधन दरवाढीमुळे परिवहन उपक्रमाचा तोटा १० कोटीच्या पुढे गेला आहे.
१५ जानेवारीपासून रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विद्युत व सीएनजी बसचा वापर केल्यामुळे शनिवारी व रविवारी प्रत्येकी ८ हजार लिटर याप्रमाणे १६ हजार लिटर म्हणजेच एका महिन्यात ६४ हजार लिटर पेट्रोलची बचत होत आहे. यातून महिन्याला ६० ते ७० लाख रुपयांची बचत होत आहे. त्यामुळे आगामी काळात सार्वजनिक सुट्टी व शनिवारी, रविवारी फक्त पर्यावरणपूरक बस चालवण्यात येणार आहेत. -योगेश कडुस्कर, उपायुक्त व परिवहन व्यवस्थापक, महापालिका
एनएमएमटी’च्या ताफ्यातील बस
१८० विद्युत
१२० सीएनजी
२७२ डिझेल