गेल्या काही दिवसांपासून राज्यसह नवी मुंबई शहरात पावसाची उघडझाप सुरू आहे. पावसाच्या संततधारेने भाज्यांच्या दर्जावर परिणाम होत असून पाण्याने भिजलेल्या भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा भाज्या कमी दराने विकण्याची नामुष्की व्यापाऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात भिजलेल्या भाज्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी घसरले आहेत.

हेही वाचा >>> उरण : भाद्रपदात श्रावण सरीचा अनुभव

राज्यसह नवी मुंबई, मुंबई उपनगरात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पाऊस सुरू आहे. वाशीतील भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक सुरळीत आहे. बुधवारी बाजारात ५२५ गाड्यांची दाखल झाल्या आहेत. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर भिजलेला भाज्या दाखल होत आहेत. परिणामी भाज्यांचा दर्जा घसरत आहे . बाजारात फ्लॉवर ,शिमला मिरची, कोबी, गवार ,भेंडी फरसबी, टोमॅटो याला अधिक फटका बसत आहे. त्यामुळे बाजारात सर्वात उत्तम दर्जा असलेल्या भाज्या चढया दराने विक्री होत आहेत तर भिजलेल्या खराब होत असलेल्या भाज्या २०% ते ३० % कमी दराने विकल्या जात आहेत. तसेच पावसामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ ही कमी होत आहे. त्यामुळे भाज्यांना उठाव कमी आहे. फ्लॉवर १२ ते १६ रुपये, काकडी ६ ते १२ रुपये, वांगी १६ ते २४ रुपये, हिरवी मिरची ३० रुपये, भेंडी २४ ते ३० रुपये, गवारी ३० रुपयांनी विक्री होत आहे.