प्रभागवार नियमनाची आखणी

राज्यात सर्वत्र उन्हाच्या झळा जाळू लागल्या असून विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. याचा फटका उरणमधील नागरिकांना तसेच उद्योगांना बसण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी उरणच्या काही भागांत जवळपास ९ तासांचे भारनियमन करण्यात आलेले होते. ही भारनियमनाची सुरुवात असून येत्या पावसाळ्यापर्यंत दररोज किमान आठ तासांचे भारनियमन करण्यात येणार असल्याचे संकेत उरण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता पावसाच्या आशेवर दिवस काढावे लागणार आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्तेत भारनियमनमुक्त राज्य करण्याची घोषणा करून काही प्रमाणात त्याची अंमलबजावणी झाली होती. त्यामुळे खंडित विजेशिवाय राहण्याची सवय अनेक ठिकाणी लागलेली आहे. परंतु राज्यातील अनेक औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील संच बंद पडल्याने महावितरण कंपनीने राज्यात भारनियमन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उरण परिसरात अनेकदा वीज खंडित होण्याच्या घटना घडत होत्या. मात्र काही कालावधीत ही वीज येत असल्याने त्याचा म्हणावा तसा परिणाम जाणवत नव्हता. असे असले तरी सध्या महावितरणने सुरू केलेल्या भारनियमन किमान आठ तासांचे असेल, असे संकेत महावितरणचे उरणचे अतिरिक्त अभियंता प्रवीण साळी यांनी दिली आहे. तसेच ज्याप्रमाणे वीज उपलब्ध होईल तसा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी विभाग करण्यात आलेले आहेत. यात प्रत्येक विभागात भारनियमन होणार असल्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली. उरणसाठी महिन्याला लागणारी वीज जशी उपलब्ध होईल, त्यानुसार हे भारनियमन  होणार आहे.