आतापर्यंत १३ लाख ६१ हजार जणांचे लसीकरण

नवी मुंबई : नवी मुंबईत लसीकरणासाठी पात्र लोकसंख्या १० लाख ८० हजार इतकी असून आतापर्यंत १३ लाख ६१ हजार मात्रांचे लसीकरण करण्यात आले आहे. शहरातील सर्वाच्या लसीकरणासाठी आठ लाख लसमात्रांची आवश्यकता आहे.

शहराची लोकसंख्या ही १५ लाख आहे. करोना लसीकरण हे १८ वर्षांवरील नागरिकांना करण्यात येत असल्याने लसीकलसीकरणासाठी पात्र लोकसंख्या ही १० लाख ८० हजार इतकी आहे. पात्र लोकसंख्येच्या तुलनेत शहराला मोफत लसीकरणासाठी २१ लाख ६० हजार लसमात्रांची आवश्यकता होती. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने जास्ती जास्त लसीकरण करता यावे यासाठी १०० लसीकरण केंद्रे उभारली. मात्र त्या प्रमाणात लस पुरवठा होत नसल्याने सरासरी एक हजार जणांचे लसीकरण होत आहे. दरम्यान खासगी रुग्णालयांनाही सशुल्क लसीकरणाची परवानगी देण्यात आल्यानंतर महापालिका केंद्रांवर प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांनी सशुल्क लस घेण्यावर भर दिला. तसेच महापालिकेने सामाजिक दायित्व निधीतूनही मोफत लस दिली. यातून आतापर्यंत शहरात १३ लाख ६१ हजार मात्रांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी ६ लाख९५ हजार ९९० लसमात्रा महापालिकेला मिळाल्या होत्या.

प्रत्येकी दोन मात्रा देण्यात येत असल्याने शहरातील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी आठ लाख लसमात्रांची गरज आहे. मात्र लस मिळत नसल्याने लसीकरण संथ गतीने सुरू आहे. ७ सप्टेंबरनंतर पालिकेला अद्याप कोविशिल्ड लस प्राप्त झाली नाही.  तिसऱ्या लाटेपूर्वी प्रत्येक नागरिकाला किमान एक मात्रा देण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. परंतु लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहे. जास्तीत जास्त लस मिळाल्यास जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने शासनाला दिवसाला ५० हजार लसमात्रा देण्याची हमी दिली असून आतापर्यंत एका दिवसात ३४ हजारांपेक्षा जास्त लसीकरण केल्याची नोंद पालिकेकडे आहे. मात्र हे सर्व नियोजन शासनाकडून प्राप्त होत असलेल्या लस उपलब्धतेवर अवलंबून आहे.

नवी मुंबई महापालिकेने इतर महापालिकांच्या तुलनेत लसीकरण अधिक केले आहे. वेगात लसीकरण करण्यासाठीची आवश्यक यंत्रणा सज्ज आहे. पालिकेने एका दिवसात ३४ हजारांपेक्षा अधिक मात्रांचे लसीकरण केले आहे. उर्वरित नागरिकांना लस मिळण्यासाठी जवळजवळ ८ लाख लसमात्रा आवश्यक आहेत.

-डॉ.रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, महापालिका