डेंग्यूचे संशयित पाचशेपार;प्रत्यक्षात आठ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न

नवी मुंबईत पावसाचे पाणी साचण्याची तशी कमी ठिकाणे आहेत.

प्रत्यक्षात आठ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न

नवी मुंबई : मुंबईत डेंग्यू संशयीत रुग्णांची संख्या वाढत असताना नवी मुंबईतही    डेंग्यूच्या संशयित  रुग्णांची संख्या पाचशे पेक्षा अधिक झाली आहे. या संशयीत रुग्णांचे अहवाल पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॅथॉलॉजीला पाठविण्यात आले होते. यात प्रत्यक्षात आठ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

नवी मुंबईत पावसाचे पाणी साचण्याची तशी कमी ठिकाणे आहेत. मात्र स्पटेंबर महिन्यात २३४ पेक्षा अधिक संशयित रुग्ण आढळले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने केलेल्या तपासणीत शहरात डास उत्पत्ती करणारी १०८ ठिकाणे सापडली होती.  त्या जागा प्रशासनाने नष्ट केल्या होत्या.  मात्र मुंबईएवढेच (५७३) संशयित रुग्ण नवी मुंबईतही आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यातील  दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशयही आहे. डेंग्यूसदृश लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांचा अहवाल हा पुण्यातील राष्ट्रीय संशोधन संस्थेकडे (एनआयपी)  पाठविण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यातील आठ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकेकाळी मलेरियाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत यंदा केवळ ३२ रुग्ण आढळून आले आहेत. चिकनगुनियाचे रुग्ण तळोजा, उरण या आजूबाजूच्या उपनगरात दिसून आले आहेत. पण नवी मुंबईत चिकनगुनियाचा रुग्ण नसल्याने येथील आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सध्या वातावरणात अनेक बदल होत असल्याने डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या ही दिवसाला २० ते २२ रुग्ण होती. ती आता निम्म्यावर आल्याने ही साथ लवकरच आटोक्यात येईल असा विश्वास आरोग्य विभागाला आहे.

ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ५४ संशयित रुग्ण आढळले होते तर सप्टेंबर महिन्यात ३६३ संशयित  होते. विशेषत: गावठाण भागात डेंग्यूचा फैलाव अधिक होता. या भागातील डास उत्पत्ती केंद्रे महापालिका प्रशासनाने नष्ट केल्याने दैनंदिन २० पर्यंत असलेली संशयित रुग्णांची संख्या १० पर्यंत कमी झाली आहे.

नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात सध्या बाह््य रुग्णांची संख्या वाढत आहे. यात डेंग्यू रुग्णांची लक्षणे आढळून आल्यास त्याची दखल घेतली जात आहे. पंधरा दिवसांत साथ आटोक्यात येईल असा पालिका प्रशासनाला विश्वास आहे.

सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या जास्त होती. दिवसाला २० ते २२ रुग्ण दाखल होत होते. मात्र आता ही संख्या निम्म्यावर आल्याने ही साथ नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या पंधरा दिवसांत ही संख्या कमी होईल असा विश्वास आहे. पालिका या रुग्णांची सर्वतोपरी दखल घेत आहे. चिकनगुनियाचे रुग्ण मात्र या शहरात अद्याप आढळून आलेले नाहीत. – डॉ. उज्ज्वला ओतुरकर, वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई पालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eight people were diagnosed with dengue akp