नवी मुंबई: अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणी संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर आठ जणांनी जोरदार हल्ला चढवला होता. यात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या समवेत असणारे पोलीस मित्र जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून हल्लेखोरांच्या विरोधात उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांनी चॉपर, तलवार, हॉकी स्पिक फायटर पंच चा वापर केला. तसेच त्यातील एका कडे गावठी कट्टा हि आढळून आला.
इस्माईल शेख, शाहिद खान, आयाज खान, आसिफ खान, मेराज खान, निजाम, शोएब , मेहराज असे यातील संशयित आरोपींची नावे आहेत. मुंबई पोलीस विभागातील अमली पदार्थ विरोधी पथक शनिवारी रात्री उलवा परिसरात अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणी संशयित आरोपीचा शोधार्थ धडकले होते. उलवा सेक्टर १९ येथील शगुन चौकात काही लोक आढळून आले त्यांच्या हालाचारी संशयास्पद होत्या. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी हे पथक गेले असता संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी हा हल्ला करताना चॉपर, गावठी कट्टा, तलवार, फायटर पंच, हॉकी स्टिक याचा वापर केला आहे. हल्लेखोर अशा पद्धतीने प्रतीकार करीत प्रतिहल्ला चढवतील असे पोलीस पथकाला वाटलेच नाही.या हल्ल्यात मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे, पोलीस मित्र फिरोज सिद्धीकी, अहमद रजा कुरेशी, आणि अतुल जैस्वाल हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी माहिती मिळताच उलवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी तात्काळ पोलीस पथक धाडले. या प्रकरणी संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यात तपास सुरु आहे.
स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली नाही. दुसर्या पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वा जिल्हा क्षेत्रात अशी कारवाई करताना स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना या प्रकरणी कळवले नव्हते. स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हल्लेखोरांना आलेले लोक हे पोलीस पथक असल्याची माहित नसल्याने त्यांनी हल्ला केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

